नेरूळ येथील वंडर्स पार्कजवळ होणाऱ्या विज्ञान केंद्राच्या नव्या निविदा प्रक्रियेला प्रथमच प्रतिसाद मिळाला आहे. या प्रक्रियेला दोन कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळाल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
विज्ञान केंद्राबरोबरच वस्तुसंग्रहालय उभारण्यात येणार आहे. बंगळूरु आणि पिंपरी-चिंचवड शहराप्रमाणेच नवी मुंबईत एक विज्ञान केंद्र तयार करण्यासाठी तत्कालीन आयुक्त डॉ. रामास्वामी प्रयत्नशील होते. विज्ञान केंद्रासाठी वेगळ्या भूखंडाची मागणी न करता पालिकेने नेरूळ सेक्टर-१९ अ वंडर्स पार्कच्या जमिनीवर हे विज्ञान केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. पाच हजार ९९७ चौरस मीटर क्षेत्रफळावर पालिकेचे विज्ञान केंद्र उभे राहणार आहे. यासाठी ८७ कोटी २६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
सुरुवातीला पालिकेने या ठिकाणी विज्ञान केंद्र, तसेच व्हिन्टेज कार निर्माण करण्यासाठीचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जवळजवळ १०७ कोटी खर्चाच्या निविदाही मागविण्यात आल्या होत्या, परंतु दोनदा फेरनिविदा काढल्यानंतरही त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता. आता पालिकेने काढलेल्या नव्या निविदेत विज्ञान केंद्र आणि भव्य सभागृहाची निविदा काढली आहे.
केंद्रात काय?
विद्यार्थ्यांना आकर्षक तसेच रोजच्या व्यवहारात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो. याची माहिती मिळणार आहे. यासाठी केंद्रात विविध विभाग उभारण्यात येतील.
पर्यावरण, जीवन, ऊर्जा, विविध यंत्रे, मानवयंत्र (रोबो), अंतराळ या महत्त्वपूर्ण घटकांचा त्याच्यात अंतर्भाव करण्यात येईल, असे पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले.