नवी मुंबई : राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून त्याचा परिणाम मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवरही (एपीएमसी) झाला आहे. राज्यभरातील शेतकरी आपला शेतमाल मुंबई एपीएमसीत विक्रीसाठी आणतात, मात्र पावसामुळे अनेक ठिकाणी पिके खराब झाली आहेत. परिणामी, बाजारात आवक घटली आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना ऐन सणासुदीच्या काळात भाज्यांच्या दरवाढीचा सामना करावा लागतो आहे.
मुंबई एपीएमसीतील व्यापाऱ्यांच्या मते, पालेभाज्यांचे दर २०-२५ टक्क्यांनी वाढले आहेत. पालक, कोथिंबीर, मेथी, पुदिना यांसह टोमॅटो, कारली, भेंडी यांचे दरही ३०-४० टक्क्यांनी वाढले आहेत. आठवडाभरापूर्वी घाऊक बाजारात १० ते १२ रुपयांपर्यंत मिळणाऱ्या पालेभाज्या आता १४ ते १८ रुपये प्रतिजुडीने विकल्या जात आहेत. ज्यात कोथिंबीर, मेथी, लाल माठ, शेपू यांचा समावेश आहे. तर पालक २० ते २४ रुपये प्रति जुडीप्रमाणे विकला जात आहे. त्यासोबतच इतर भाज्यांवरही पावसाचा प्रभाव जाणवत आहे. पावसामुळे शेतमाल सडल्याने बाजारात मालाची उपलब्धता घटली आहे. परिणामी, मागणीपेक्षा पुरवठा घटल्याने भाज्यांचे दर वाढले आहेत.
सध्या घाऊक बाजारात भेंडी आता ५०-५४ रुपये किलोपर्यँत पोहोचली आहे. त्याचप्रमाणे फरसबी ३०-५० रुपये किलो, फ्लॉवर आणि कोबी १६ ते २० रुपये किलो, गवार ७०-९० रुपये किलो, घेवडा ४०-५० रुपये किलो आणि मटार ८०-१०० रुपये किलोपर्यंत विकले जात आहेत. तर आठवडाभरापूर्वी १०-१४ रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो आता २०-२५ रुपये किलोने विकला जात आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातही भाज्यांच्या किमती वाढल्या आहेत.
उपवास व्रतवैकल्यांमुळे मागणीत वाढ
पावसामुळे पिकांचे झालेले नुकसान, वाहतुकीत येणाऱ्या अडचणी आणि बाजारातील घटलेला पुरवठा ही या दरवाढीची मुख्य कारण आहेत. नवरात्रीसारख्या धार्मिक सणामुळे मागणी वाढल्याने काही भाज्यांचे दर थेट वाढले आहेत. सध्या नवरात्रीनिमित्त व्रतवैकल्ये असल्याने सर्वसामान्य नागरिकांना ही दरवाढ थेट जाणवत आहे. स्वयंपाकघराच्या बजेटवर याचा ताण पडला असून, अनेकांना भाज्या खरेदी करताना खर्चाचा विचार करावा लागतो आहे.
“सध्या पावसामुळे बाजारात मालाची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे पालेभाज्या, गवार, शेवगा यांसारख्या भाज्यांचे दर वाढले आहेत. नवरात्री नंतर परिस्थितीत काहीशी सुधारणा होऊ शकते, पण सध्या बाजारातच मालाची उपलब्धता कमी असल्याने ग्राहकांना काही काळ ताण सहन करावा लागेल.” – प्रदीप साहू, भाजीपाला व्यापारी, एपीएमसी