नवी मुंबई : शहराच्या विकासासाठी त्या शहराच्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडून सविस्तर आराखडा तयार केला जातो. यामध्ये रुग्णालयासाठी, शाळा, उद्यान, स्मशानभूमी आणि इतर प्रकल्पांसाठी जागा आरक्षित करण्यात येतात. हा आराखडा नेमका कसा तयार केला जातो आणि भविष्यात आवश्यकतेनुसार या जागांचे आरक्षण कसे बदलले जाते, त्याची प्रक्रिया कशी असते, याचा उलगडा नवी मुंबईवासीयांना ‘लोकसत्ता’ आयोजित ‘शहरभान’ उपक्रमातून होणार आहे. गेली अनेक वर्षे ‘नियोजित शहर’ ही बिरुदावली असलेल्या नवी मुंबई शहराने आजही ही ओळख कशी जपून ठेवली आहे, याची माहितीही नवी मुंबईवासीयांना या उपक्रमातून होणार आहे.

शहर सुस्थित राहावे यासाठी नियोजन करणारी यंत्रणा कशी काम करते, ही यंत्रणा राबविणाऱ्या प्रशासनामध्ये आणि नागरिकांमध्ये संवाद वाढवा यासाठी ‘लोकसत्ता’तर्फे शहरभान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ठाणे येथून सुरुवात करण्यात आलेल्या या उपक्रमाला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतर आता हा उपक्रम नवी मुंबई, वाशी येथील मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळ, सेक्टर ६ येथे शुक्रवार, २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता पार पडणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवी मुंबई शहर हे तसे नियोजित शहर. येथील रस्त्यांची आखणी, शासकीय तसेच खासगी इमारतींची बांधणी यात एक शिस्तबद्धता दिसून येते. येथे नव्याने होत असलेल्या विमानतळाने या शहराचे महत्त्व अधिक अधोरेखित होणार आहे. मात्र हे नियोजन करणे महत्त्वाचे आणि कलात्मकतेचे काम. यासाठी स्थानिक यंत्रणेकडून शहराचा विकास आराखडा आखला जातो. पालिकेच्या शहर विकास विभागामार्फत ही सर्व कामे करण्यात येतात. या विभागाचे कामकाज नेमके कसे चालते आणि शहराचा विकास आराखडा कसा तयार केला जातो, त्याची प्रक्रिया कशी असते, याचा उलगडा ‘लोकसत्ता’ आयोजित ‘शहरभान’ उपक्रमातून होणार आहे.