नवी मुंबई : नवी मुंबईतील रबाळे पोलिस ठाण्याच्या हद्दीत मिक्सर चालक प्रल्हाद कुमार यांच्या झालेल्या अपहरण प्रकरणात वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे पालक दिलीप आणि मनोरमा खेडकर यांच्याविरोधातील तपास अधिक गंभीर वळणावर पोहोचला आहे. पोलिसांनी या दांपत्याविरुद्ध न्यायालयात सादर केलेल्या अहवालात, आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचे, खोटे निवेदन देत असल्याचे आणि पुरावे नष्ट केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. यामुळे आरोपींना पोलीस कोठडीत घेऊन तपास करण्याची गरज असल्याचे मत पोलिसांनी न्यायालयात ठामपणे मांडले आहे.

मनोरमा खेडकर यांना मागील सोमवारी जामीन मंजूर झाल्यानंतरही त्या आजपर्यंत पोलिस तपासासाठी हजर झालेल्या नाहीत, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली. रबाळे पोलिसांनी खेडकर यांच्या घरी नोटीस बजावली असून, त्यांच्या पूर्वीच्या वकिलांमार्फत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, वकिलांनीही त्यांच्याशी कोणताही संपर्क नसल्याचे स्पष्ट केले.

दिनांक ४ ऑक्टोबर रोजी दिलीप खेडकर यांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू असताना पोलिसांनी न्यायालयात मनोरमा खेडकर तपासात सहकार्य करत नसल्याचे सांगितले. यानंतर त्याच सायंकाळी सूर्यास्तानंतर त्या अचानक रबाळे पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाल्या. महिलांना सूर्यास्तानंतर चौकशीसाठी बोलावता येत नाही याची माहिती असूनही, केवळ पोलिसांना चुकवण्यासाठी त्यांनी असा प्रयत्न केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता येण्यास सांगितले होते, परंतु त्या रविवारीही चौकशीसाठी आल्या नाहीत.

जामीन अर्जातील ‘खोटेपणा’ उघड

मनोरमा खेडकर यांच्या जामीन अर्जात खोटे विधान करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यांनी अर्जात, “अपहृत व्यक्तीस चांगले खायला दिले,” असे नमूद केले होते, मात्र अपहृत प्रल्हाद कुमार यांच्या जबाबातून याच्या उलट सत्य समोर आले आहे. त्यांना शिळे अन्न देण्यात आले आणि ते भुकेले असूनही त्यांनी ते अन्न खाल्ले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, “त्याला सकाळी सोडून दिले” हा त्यांचा दावाही खोटा असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले आहे.

दिलीप खेडकर यांच्या कृतीवर गंभीर निरीक्षणे

पोलिसांनी न्यायालयात मांडलेले मुद्दे दिलीप खेडकर यांच्या गंभीर वर्तनावर प्रकाश टाकतात. १३ सप्टेंबर रोजी रबाळे परिसरात लँड क्रूझर आणि मिक्सरमध्ये किरकोळ अपघात झाल्यानंतर खेडकर यांनी मिक्सर चालकावर हल्ला करून त्याला जबरदस्तीने आपल्या गाडीत बसवले आणि पोलिसांकडे न नेता पुण्यातील बंगल्यात तळघरात डांबून ठेवले. पोलिस पोहोचल्यावर त्यांच्या पत्नी मनोरमा खेडकर यांनी दरवाजा बंद करून बाहेर कुत्रे सोडले आणि पोलिसांना आत येऊ दिले नाही. यानंतर ‘स्टेशनला येतो’ असे सांगून खेडकर व सहकारी फरार झाले.

तपासात आरोपींनी पुरावे नष्ट केल्याचेही पोलिसांनी सांगितले. डीव्हीआर गायब करण्यात आला, गाडी आणि मोबाईल लपवण्यात आले. तसेच अपहरणाच्या रात्री आरोपींनी कोणाशी संपर्क साधला हे तपासणे आवश्यक असल्याचे नमूद करत पोलिसांनी त्यांना कोठडीत घेऊन सखोल चौकशीची मागणी न्यायालयात केली.

आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी

दिलीप आणि मनोरमा खेडकर हे दोघेही माजी शासकीय अधिकारी असूनही त्यांच्या विरोधात पिस्तुलाचा धाक दाखवून जमीन अतिक्रमण केल्याचा गुन्हा आधीच दाखल आहे. त्यांचे काही सहकारीसुद्धा गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे पोलिसांनी अहवालात स्पष्ट केले आहे. पोलिसांनी आपले मत स्पष्ट करताना म्हटले आहे की, “आरोपी उच्चशिक्षित असले तरी त्यांनी कायद्याचा गैरवापर केला आहे. त्यांनी केलेली कृत्ये संघटित गुन्हेगारी स्वरूपाची आहेत. तपासाला ते अजिबात सहकार्य करत नाहीत आणि पुरावे नष्ट करत आहेत. त्यामुळे सत्यशोधनासाठी त्यांना पोलिस कोठडीत घेणे अत्यावश्यक आहे.”

रबाळे पोलिस स्टेशनचे तपास पथक या प्रकरणात कसून चौकशी करत असून, दिल्ली, पुणे आणि नवी मुंबई या तिन्ही ठिकाणी तपासाचा विस्तार केला जात आहे. न्यायालयात पुढील सुनावणीदरम्यान आरोपींच्या जामीन अर्जावर निर्णय होणार असून, आरोपींना जामीन मिळाल्यास तपासावर गंभीर परिणाम होईल, असा दावा पोलिसांनी केला आहे.