नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये उभारलेल्या सुविधा इमारती नव्या वर्षात नागरिकांसाठी खुल्या करण्याची आखणीबद्ध योजना अखेर प्रशासनाने आखली आहे. वाशी सेक्टर ३ येथे पोलीस ठाण्यास लागून असलेले समाज केंद्र शहरातील जुन्या संस्थांसाठी पुन्हा खुले केल्यानंतर अशाच पद्धतीने आरोग्य केंद्र, व्यायामशाळा, वाचनालय, ग्रंथालये तसेच काही उपनगरांमधील भाजी तसेच मासळी बाजाराच्या वास्तू टप्प्याटप्प्याने खुल्या केल्या जाणार आहेत.

हेही वाचा : नवी मुंबई : घणसोली पुलाचे काँक्रीटीकरण सुरू, परिणामी एक मार्गिका बंद राहणार

नवी मुंबई महापालिकेने शहरातील वेगवेगळ्या उपनगरांमध्ये मोठया प्रमाणावर नागरी सुविधांसाठी आवश्यक अशा वास्तू उभारल्या आहेत. महापालिका निवडणुका होऊन आता चार वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी लोटला आहे. नगरसेवकांच्या आग्रहामुळे वेगवेगळ्या प्रभागांमध्ये महापालिकेने नागरी सुविधांसाठी आवश्यक असलेल्या काही इमारतींची उभारणी करण्यात आली. यामध्ये आरोग्य केंद्र, सामाजिक भवन, लग्न तसेच इतर समारंभासाठी सभागृह, व्यायामशाळांचा समावेश आहे. कोड काळात यापैकी काही इमारतींमध्ये तात्पुरत्या स्वरूपात कोवीड केंद्र उभारण्यात आली. कोविड काळ संपूष्टात येऊन मोठा कालावधी लोटूनही काही वास्तूंमधील मुळ वापर सुरू झालेला नाही. महापालिकेच्या वास्तू अशाप्रकारे धुळखात पडल्याने त्या लवकरात लवकर सुरू कराव्यात अशी मागणी वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी या सर्व वास्तू नागरिकांसाठी खुल्या करण्यासाठी आखणी करण्याचे आदेश संबंधीत विभागाला दिल्या आहेत.

हेही वाचा : पनवेलमध्ये हलगर्जी करणाऱ्या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल

“सुविधा इमारती या नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाच्या असतात. वाशीसारख्या शहरात समारंभांसाठी मोक्याच्या ठिकाणी सभागृह उपलब्ध होत असेल तर ते सर्वच उपनगरांमधील रहिवाशांनाही उपयुक्त ठरू शकेल. Ashley प्रयोजनासाठीच्या या वास्तू नव्या वर्षात वेगाने खुल्या केल्या जातील.” – राजेश नार्वेकर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाशीत पाहणी दौरा

  • महापालिका आयुक्तांनी मध्यंतरी वाशी उपनगरातील काही सुविधा इमारतींची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वाशी सेक्टर १४, १५ येथे उभारण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद सांस्कृतिक भवनाच्या इमारतीत कोविड काळात काळजी केंद्र स्थापित करण्यात आले होते. हे केंद्र कोविड काळ संपताच बंद करण्यात आले आहे.
  • या इमारतीत पुन्हा एकदा नागरी सुविधा सुरु करण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. या ठिकाणी तळमजल्यावर आपला दवाखाना कार्यान्वित करण्यात येणार असून व्यायामशाळा, आरोग्य सुविधा, लग्न आणि इतर समारंभासाठी सभागृह तसेच भोजनगृह अशा सुविधा कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने नियोजन महापालिकेने हाती घेतले आहे.

हेही वाचा : VIDEO : कोणावर विसंबून राहू नका, स्वतःच सक्षम बना; तरुणीवर हल्ला, लोकांनी घेतली फक्त बघ्याची भूमिका

वाशीचे सामाजिक भवनही पूर्ण खुले होणार

  • वाशी सेक्टर ३ येथे पोलीस ठाण्यास लागूनच उभारण्यात आलेल्या महात्मा फुले सांस्कृतिक भवनाच्या इमारतीचे नुकतेच लोकार्पण झाले आहे. याठिकाणी मुळ स्वरुपात असलेल्या काही सामाजिक सस्थांना पुन्हा एकदा जागा देण्यात आल्या असून या संस्थांकडून सुविधा सुरु करण्याचे काम केले जात आहे.
  • या ठिकाणी इतर मजल्यांवर सुविधा तातडीने उपलब्ध करुन देण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
  • तळमजल्यावर समाजविकास विभागामार्फत शिलाई प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे पहिल्या मजल्यावर १५० पेक्षा अधिक प्रेक्षक क्षमतेचे वातानुकूलीत सभागृह, दुसरा मजल्यावर ४३ आसन क्षमतेचे लहान सभागृह सुरु केले जाणार आहे.
  • तिसऱ्या मजल्यावर ५० आसन क्षमतेचे सभागृह तसेच व्यायामशाळेसाठी जागा आहे. या सुविधा नव्या वर्षात सुरु करण्यात येणार आहेत. याशिवाय इतर उपनगरांमधील नागरी सुविधांच्या वास्तूंचा फेरआढावा घेतला जात आहे.