पनवेल: जेएनपीटी बंदर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवीन विस्तारीत तळोजा औद्योगिक क्षेत्र यामुळे पनवेल हे नवीन उद्योगकेंद्र बनत असताना अजूनही ग्रामीण पनवेलच्या ५० गावे आणि २५ वाडे व पाड्यांवर वीज व्यवस्थेचा पुरता फज्जा उडालेला आहे. या परिसरात दिवसातून दोन ते तीन वेळा विजेचा लपंडाव सुरू असतो. वीज महावितरण कंपनीने मागील १३ वर्षांपासून नेरे येथे उपकेंद्र उभारणीचे काम हाती घेतले आहे. मात्र ग्रामीण भागातील वीज यंत्रणेच्या सुधारणेला फारसे प्राधान्य महावितरणच्या ‘प्रकाशगडा’वरील वरिष्ठ अधिकारी देत नसल्याने पनवेलकरांवर बेभरवशाच्या विजेवर राहण्याची वेळ आली आहे.

पनवेल व उरण परिसरात मागील चार वर्षांत तब्बल दोन लाख वीज ग्राहक वाढले आहेत. सध्या साडेपाच लाख घरगुती आणि ६०० औद्योगिक वापरकर्ते वीज ग्राहक पनवेलमध्ये आहेत. महिन्याला सुमारे अडीचशे कोटी रुपयांचे वीज शुल्क महावितरण कंपनीच्या तिजोरीत जमा होते. वेगवेगळ्या ९ फीडरवरुन पनवेलच्या वीज महावितरण कंपनीचा कारभार केला जातो.

गव्हाण, पारगाव, तळोजा, नावडे, नेरे, पनवेल, कळंबोली, खारघर आणि उरण अशा फीडरवरुन वीज उपकेंद्रातून ग्राहकांना पुरवठा केला जातो. यातील नेरे फिडरवर जे २८ हजार वीजग्राहक अवलंबून आहेत त्यांना सध्या उपकेंद्र सुरू न झाल्याचा मोठा फटका त्यांना सहन करावा लागत आहे. सुमारे ८ कोटी रुपये खर्च करुन नेरे येथील महालक्ष्मी नगर येथे उपकेंद्राला जागा उपलब्ध झाली आहे. परंतु तीनवेळा कंत्राटदार बदलूनही हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.

सध्या हे काम एस.टी. इलेक्ट्रीकल कंपनीला दिले आहे. हे काम पूर्ण करण्याची अंतिम मुदतवाढ संबंधित कंपनीला दिल्याचे महावितरण कंपनीच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून समजते. मात्र प्रत्यक्षात हे उपकेंद्र कधी सुरू होईल याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. एस.टी. इलेक्ट्रीकल्स कंपनीचे संजय तिवारी यांना विचारल्यावर ते निधी अभावी काम रखडल्याची सबब देतात. मात्र महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारल्यावर असे काही नसल्याचे उत्तर अधिकाऱ्यांकडून मिळते. १० एमव्हीए क्षमतेचे हे उपकेंद्र आहे. या उपकेंद्राला पोदी ते नेरे (महालक्ष्मीनगर) या पल्यावरुन दोन वीज वाहिन्या भूमिगत पद्धतीने उपकेंद्रापर्यंत आणण्याचे काम पूर्ण झाले आहे. परंतू अजूनही उपकेंद्रातील रोहित्र तपासणीचे काम पूर्ण न झाल्याने येथे रोहित्र सुरू झालेला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, याबाबत वीज महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता संजय पाटील यांच्याकडे याविषयी संपर्क साधल्यावर त्यांनी नुकताच पदभार स्वीकारल्याचे सांगत रखडलेल्या वीज उपकेंद्राची माहिती घेतल्याचे सांगितले. तसेच पनवेल (नेरे) येथील उपकेंद्राच्या कामाच्या सद्यस्थितीची पाहणी ते स्वतः करणार असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले.