जयेश सामंत

नवी मुंबई : शिवडी नाव्हाशेवा अटल सेतूच्या शुभारंभसाठी नवी मुंबईत येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी महायुतीतील भाजप शिवसेना या दोन पक्षांनी जोरदार राजकीय शक्ती प्रदर्शनाची तयारी केल्याचे दिसून येत आहे. अटल सेतूचं नवी मुंबईचा टोक असलेल्या शिरले नाका ते नवी मुंबई विमानतळा मार्गावर पंतप्रधानाच्या स्वागतासाठी जागी जागी जय श्री रामाचे लावलेले फलक लक्ष वेधून घेणारे ठरले आहेत. मुंबई महानगर प्रदेशातील विकासाला चालना देणाऱ्या प्रकल्पांची आज पायाभरणी होत असताना भाजपाने या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिलेला जय श्री रामाचा नारा चर्चेचा विषय ठरला आहे.

नाशिक येथील कार्यक्रम आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास शिवडी नावाशेवा सागरी अटल सेतूचे लोकार्पण करण्यासाठी नवी मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधानाच्या स्वागतासाठी यावेळी मुंबई ठाणे आणि रायगड पट्ट्यातील भाजप शिवसेनेच्या नेत्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी केली आहे. या कार्यक्रमासाठी सव्वा लाख महिला पुरुषांची गर्दी जमवण्याचे नियोजन करण्यात आले असून पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्याकडे नियोजनाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिरले ते नवी मुंबई विमानतळ या साडेपाच किलोमीटर अंतराच्या मार्गावर मिरवणूक काढण्यात येणार असून यावेळी आगरी कोळी पारंपारिक पद्धतीने पंतप्रधानांचे स्वागत केले जाणार आहे. हे करत असताना या संपूर्ण महोत्सवाला येत्या २२ तारखेला होणाऱ्या राम मंदिर उद्घाटनाचा चढविण्याचा प्रयत्नही महायुतीकडून पद्धतशीरपणे करण्यात आल्याचे चित्र आता दिसत आहे.

हेही वाचा… विश्लेषण : शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू मुंबई आणि नवी मुंबईसाठी किती फायदेशीर? काय आहेत वैशिष्ट्ये?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अटल सेतूच्या पायथ्यापासून नवी मुंबई विमानतळाच्या मार्गापर्यंत जागोजागी जय श्री रामाचा नारा देणारे फलक आणि पंतप्रधान यांची छबी असलेले बॅनर जागोजागी लावण्यात आले आहेत. काही ठिकाणी विकासाच्या वाटेवर समर्थ भारताचे पुनरुत्थान असा संदेश देणारे फलक ही लावण्यात आले आहेत. जागोजागी उभारण्यात आलेले श्री राम मंदिराचे बानर आणि जय श्री रामाचा नारा देणारे पलक पंतप्रधानांच्या मिरवणूकित लक्षवेधी ठरतील अशा पद्धतीने उभारले गेले आहेत. अटल सेतूच्या दोन्ही बाजूस समुद्रात मोठ्या संख्येने बोटी तैनात करण्यात आल्या असून या बोटीतून दीडशे फूट उंचीचे जय श्रीराम गोंदविलेले फुगे सोडण्यात येणार आहेत अशी माहिती उरणचे आमदार महेश बालदी यांनी लोकसत्ताला दिली.