पनवेल – कामोठे येथील जुई गावात ६ वर्षांपूर्वी एकाने आपल्या पत्नीला रॉकेलमध्ये पेटवले होते. पाच दिवसांनी उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाल्यापासून कामोठे पोलीस संशयीत पतीचा शोध घेत होते. मात्र पोलिसांच्या विविध पथकाने शोध घेऊनही माथेफीरू पती सापडत नव्हता. अखेर कामोठे पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर पत्नीचा खून करून फरार असलेल्या आरोपी पतीला हैद्राबाद येथून शनिवारी अटक केली. 

जुई गावातील एका भाड्याच्या घरात मनोहर सरोदे आणि त्याची पत्नी आणि मुले असे कुटूंबिय राहत होते. ४ डिसेंबर २०१९ रोजी मनोहरने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला रॉकेल ओतून पेटवून टाकले. या घटनेनंतर मनोहर पळून गेला. तर मुलांची वाताहत झाली. दोन मुलांना अनाथ आश्रमात आश्रय घ्यावा लागला. पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकाने या घटनेनंतर मनोहरच्या गावापर्यंत शोध घेतला. परंतू घटना घडल्यावर मनोहर एकदा त्याच्या मूळ गावी नांदेड येथे गेला आणि त्याचे वडिल त्याला पोलिसांत घेऊन जात असल्याचे समजल्यावर तो तेथून पळाला. त्यानंतर तो गावी कधीच परतला नाही.

पोलिसांनी अनेकदा शोध घेऊनही मनोहर सापडत नसल्याने हे प्रकरण २०२३ मध्ये बंद करण्यात आले. परंतू नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सध्या नवी मुंबईतील सर्वच पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिका-यांना ज्या प्रकरणातील आरोपी अनेक वर्षे फरार आहेत यांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानूसार पोलीस उपायुक्त प्रशांत मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त विक्रम कदम यांच्या नेतृत्वाखाली कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांनी जुई गावातील महिलेच्या खूना प्रकरणाची पुन्हा झाडाझडती घेण्याचे आदेश सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत तायडे यांना दिले.

पोलीस अधिकारी प्रशांत तायडे यांनी हे तपास बंद प्रकरणाची फाईल पुन्हा एकदा उघडून त्या प्रकरणाचा तपास सुरू केला. फरार मनोहरच्या एका दूरच्या नातेवाईकाने पोलिसांना दिलेल्या माहितीनूसार मनोहर सध्या स्वताचे नाव बदलून हैद्राबाद येथे राहत असून तो नवीन नावाने वावरतो. तसेच त्याची नांदेड येथे राहणारी मुलगी व जावयाच्या तो संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याच माहितीच्या आधारावर कामोठे पोलिसांनी मनोहरची मुलगी व जावयाचा मोबाईलनंबरवर फेब्रुवारी ते जून महिन्यापर्यंत पाळत ठेवली. कोणकोणत्या मोबाईल नंबरवरून या दोन मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला जातोय. याचे दोन महिने पोलिसांनी निरीक्षक केले.

जून महिन्यात मनोहरचा नंबर सापडल्यानंतर त्याच्या मोबाईलवर पाळत ठेवल्यानंतर त्याचा हैद्राबाद (तेलंगणा) येथील बगलागुंडा पोलीस ठाणे हद्दीतील जहांगिराबाद येथील पत्ता पोलिसांना सापडला. कामोठे पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी तायडे यांचे पोलीस पथक हवालदार संजय झोळ, पोलीस नाईक सचिन ठोंबरे, पोलीस नाईक प्रविण पाटील, शिपाई प्रमोद कोकाटे यांनी या शोधमोहीमेत सखोल तपास केला.

शनिवारी ५० वर्षीय मनोहरला अटक करून पनवेल येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्याने दारूच्या नशेत पत्नीवरील संशयामुळे तिला पेटवून दिल्याचे पोलिसांना सांगीतले. सध्या मनोहर पिंटू सींग या नावाने वावरत होता. भूशाच्या गाडीवर क्लिनरचे काम करून तो स्वताचा उदरनिर्वाह करत होता. न्यायालयाने त्याच्याकडून अधिक माहिती मिळविण्यासाठी पोलिसांना चार दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.