कांदळवन क्षेत्र वन विभागाकडे हस्तांतरित

सिडकोने नेहमीच पर्यावरणपूरक विकासाचा आपल्या धोरणाद्वारे पुरस्कार केला आहे.

पनवेलमधील २१९ हेक्टर क्षेत्राचा समावेश

नवी मुंबई : सिडकोकडून पनवेल तालुक्यातील कांदळवनांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याकरिता, महामंडळाच्या ताब्यातील २१९ हेक्टर कांदळवन क्षेत्र  वन विभागाच्या कांदळवन कक्षाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रायगड जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सदर कांदळवन क्षेत्र वन विभागाला हस्तांतरित करण्यात येणार आहे. यामुळे ठाणे खाडीलगत असलेले महामुंबई क्षेत्रातील कांदळवन क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे

सिडकोने नेहमीच पर्यावरणपूरक विकासाचा आपल्या धोरणाद्वारे पुरस्कार केला आहे. या धोरणाला अनुसरूनच नवी मुंबईतील कांदळवनांच्या संरक्षण व संवर्धनाकरिता, सिडकोच्या ताब्यातील हे क्षेत्र वन विभागाला हस्तांतरित करण्यात येणार असल्याचे सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले.

मुंबई महानगर प्रदेशातील कांदळवनांचे राखीव वने म्हणून संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी, संबंधित प्राधिकरणांकडून आपापल्या अखत्यारीतील कांदळवन क्षेत्रांचे वन विभागाच्या कांदळवन कक्षाकडे हस्तांतरण करण्यात येत आहे. यानुसार, सिडकोकंडील नवी मुंबई प्रकल्प अधिसूचित क्षेत्रातील, पनवेल तालुक्यातील मौजे कामोठे आणि मौजे पनवेल येथील एकूण २१९ हेक्टर कांदळवन क्षेत्रही वन विभागाला हस्तांतरित होणार आहे. या संदर्भात सिडकोने रायगड जिल्हाधिकारी, यांच्याशी पत्रव्यवहार केला असून त्यांच्याकडून २७ जुलै रोजी सिडकोच्या कांदळवन क्षेत्राचा ताबा घेण्यात आला असून त्यानंतर हे क्षेत्र वन विभागाच्या कांदळवन कक्षाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. तसेच पुढील टप्प्यात पनवेल आणि उरण तालुक्यांतील काही कांदळवन क्षेत्रे, कांदळवन कक्षाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहेत. यामुळे नवी मुंबईतील कांदळवन क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kandalvan area transferred to forest department ssh