एक कोटींचा निधी; बोटींसाठी तात्पुरती व्यवस्था

मच्छीमार बोटींच्या वाढत्या संख्येमुळे मुंबईच्या ससून डॉक मच्छीमार बंदरावरील भार वाढला आहे. तो कमी करण्यासाठी करंजा येथे नवे बंदर उभारले जाणार आहे. परंतु गेल्या चार वर्षांपासून त्याचे काम निधीअभावी रखडले आहे. त्यामुळे कोकणातील मच्छीमारांचे मोठे नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी  मिळणाऱ्या निधीची वाट न पाहता मच्छीमारांनी लोकवर्गणीतून चक्क एक कोटी रुपये जमा करून या बंदरावर तात्पुरती का होईना, बोटी उभ्या करण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे मच्छीमारांना त्याचा फायदा होत आहे. निधीत वाढ झाल्यास कोकणातील अधिकाधिक मच्छीमारांना त्याचा फायदा होईल असा विश्वास मच्छीमार नेत्यांनी व्यक्त केला आहे.

मच्छीमारांसाठी स्वातंत्र्यापूर्वी बांधलेले मुंबईतील ससून डॉक हे एकमेव बंदर आहे.  या बंदरात मासळीची खरेदी विक्री, सफाई, साठवणूक व इतर प्रक्रिया आदी केली जाते. यात महाराष्ट्रातीलच नव्हे तर गुजरात राज्यातील मच्छीमार बोटीतीलही मासळीची विक्रीही येथे केली जाते. या बंदरातील मासेमारी बोटींची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने  येथील जागा कमी पडू लागली आहे.

या बंदरात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असे १५ ते २० हजार रोजगार उपलब्ध आहेत. ससून  डॉकवरील भार आणि ताण कमी करण्यासाठी २०११ मध्ये केंद्र व राज्य सरकारने ७५ व २५ टक्केच्या निधीच्या भागीदारीतून ७० कोटी रुपये खर्चाचे करंजा येथे नवे मच्छीमारी बंदर उभारण्यास सुरुवात केली होती. हे बंदर झाल्यानंतर कोकणातील मच्छीमारांना ते जवळ असल्याने त्याचा त्यांना फायदा होणार आहे. करंजा बंदराचे काम सुरू झाले होते.  बॅक वॉटरचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील काम करीत असताना २०१२ साली खडक लागल्याने कामामध्ये अडथळा आला. त्यामुळे कामाच्या खर्चात वाढ होऊन तो ७० कोटीवरून दीडशे कोटी रुपयांवर पोहचला आहे. राज्य आणि केंद्र सरकारने ५०-५० टक्के भागीदारीत हा निधी खर्च करण्याचे ठरले आहे. परंतु हा वाढीव निधी येण्याचे रखडल्याने बंदरातील काम बंद पडले आहे.

हे काम सुरू होत नसल्याने मच्छीमारांचेही आर्थिक नुकसान होत आहे. निधी कधी येईल आणि हे काम कधी सुरू होईल याबाबत काहीच माहीत नसल्याने अखेर  मच्छीमार सोसायटी एकत्र येऊन या बंदरावर बोटी उभ्या करण्याची व्यवस्था करण्यासाठी तात्पुरती व्यवस्था तरी करावी याबाबत निर्णय घेतला आणि त्यासाठी लागणारा निधी लोकवर्गणीतून गोळा करण्याचे ठरविले. त्यानुसार गोळा झालेल्या लोकवर्गणीतून सुमारे एक कोटी रुपयांचा निधी उभा राहिला. या निधीतून तात्पुरती बोटी लावण्यासाठी तसेच जाळी ठेवण्याची येथे व्यवस्था करण्यात आली. अशाच प्रकारच्या लोकवर्गणीतून पुढील काम करण्याचीही इच्छा करंजा मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष शिवदास नाखवा यांनी व्यक्त केली. बंदराचे काम पूर्ण करण्यासाठी निधीचाही पाठपुरावा केला जाणार आहे.

सुविधा मिळणार

बंदराच्या निर्मिती नंतर बोटीसाठी लागणारे इंधन, साहित्य देणारे व्यवसाय, साठवणुकीसाठी गोदाम, लिलावासाठी लागणारे कामगार, बोट दुरुस्ती, बर्फ, वाहने, हॉटेल्स, मच्छीची वर्गवारी यांची व्यवस्था असणार आहे. तसेच यामुळे किमान दहा हजारापेक्षा अधिक कामगारांना काम मिळणार आहे.