केंद्रीय विहार, खारघर

संकुलात पर्यावरणपूरक  शोभेची झाडे, फुले आणि फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. फळझाडांना कमी प्रमाणात आलेली फळे प्रत्येक कुटुंबात वाटली जातात.

खारघरमधील केंद्रीय विहार हे नवी मुंबईतील सर्वोत्तम वसाहतींपैकी एक गृहसंकुल आहे. केंद्र सरकारचा हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. ‘केंद्र सरकार कर्मचारी कल्याण गृहनिर्माण संघटने’च्या माध्यमातून निर्माण झालेल्या केंद्र विहारची नवी मुंबई शहराप्रमाणेच स्मार्ट वाटचाल सुरू आहे. या संकुलाचे नियोजन कधीकधी फसते; परंतु नंतर आढावा घेऊन त्यातील त्रुटी दूर केल्या जातात आणि समस्या सोडविल्या जातात.

खारघर रेल्वे स्थानकापासून १५ मिनिटांच्या अंतरावर केंद्र विहार मध्यवर्ती ठिकाणी वसलेले आहे. खारघरमधील पहिले सर्वात मोठे गृहसंकुल. सुरुवातीला फसलेल्या नियोजनाचा सखोल अभ्यास करून विहार नीटनेटके आणि सुस्थितीत कसे ठेवता येईल यांचे नियोजन केले जाते. केंद्रीय विद्यमान आणि निवृत्त कर्मचाऱ्यांकरिता ही गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यात आली. केंद्रीय विहार वन बीएचके, टू आणि थ्री बीएचके अपार्टमेंटमध्ये विभागलेले आहे. संकुलात १२३० सदनिकांचा समावेश आहे. सुरुवातीला एकच समिती संपूर्ण सोसायटीची जबाबदारी पेलण्याचे काम करीत होती; मात्र कालांतराने एका समितीला सांभाळणे अवघड बनत चालले होते. टप्प्याटप्प्याने प्रत्येक इमारतीची देखभाल करता यावी, यासाठी सहा संस्थांसाठी सहा नोंदणीकृत संस्था आणि त्या प्रत्येक संस्थेवर एक फेडरेशन तयार करण्यात आले. या फेडरेशनच्या माध्यमातून नियमावली, नियोजन केले जाते.

वृक्ष संवर्धनातून संकुलात पर्यावरणपूरक वातावरण निर्माण केले आहे. यात शोभेची झाडे, फुले आणि फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. फळझाडांना कमी प्रमाणात आलेली फळे प्रत्येक कुटुंबात वाटली जातात. प्रवेशद्वारावर रस्त्याच्या दुतर्फा झाडे, लोखंडी खांब आणि आसनव्यवस्था आहे. प्रवेशद्वारावरूनच नियोजनबद्ध संकुलाचे दर्शन होते. केंद्रीय विहाराच्या आवारातील सहा संस्थांनी ठिकठिकाणी प्रवेशद्वार सुरक्षा चौकी तयार केली आहे. प्रत्येक संस्थेतील इमारतीत प्रवेश करताना बहरलेल्या वेलींची चौकट सदैव स्वागतास असल्यासारखे वाटते. तेच इमारतीत  प्रवेश करताना तिथेही एक सुरक्षित दरवाजा बसविण्यात आला आहे. त्याला टाळे बसवून अधिक सुरक्षित करण्यात आले आहे.

पावसाळ्यात इमारतींच्या छतावरून गळती होत असल्याने इमारत खिळखिळी होत होती, त्यावर उपाय म्हणून छतांवर पत्रे बसवून ती समस्या मार्गी लावण्यात आली. तसेच त्या पत्र्यांवरून पडणारे पाणी यांचा वापर करण्याचा विचार आहे.

समाजकेंद्र

संकुलात समाजकेंद्र आहे. यात अनेक सण साजरे केले जातात. लग्न समारंभ इतर अनेक कार्ये, उत्सव पार पाडले जातात. तसेच बाहेरील व्यक्तींना भाडेतत्त्वावर येथे उत्सव साजरे करण्याची मुभा देण्यात येते. तसेच इथे रोज सकाळी भक्ती संगम संस्थेच्या माध्यमांतून १५० नागरिकांना योगाचे धडे दिले जातात. कराटेचे वर्गही भरवले जातात.

नियोजबद्ध पार्किंग 

संकुलातील रहिवाशांसाठी वेगळी पार्किंगची जागा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. येथे सरळ आणि खुल्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. पार्किंगच्या समस्येतूनही खुल्या पार्किंगमध्ये राखीव पार्किंगचे फलक आणि कोणत्या वाहनासाठी राखीव आहे, त्या वाहनाचा क्रमांक त्या फलकावर लावण्यात आला आहे. तसेच दिलेल्या जागेतच वाहन पार्क केले जावे यासाठी दोन्ही बाजूंना कमी उंचीचे दुभाजक बसविण्यात आले आहेत. बाहेरून येणाऱ्या वाहनांसाठी वेगळी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.