उरण : बेलापूर /नेरूळ-उरण लोकल मार्गावरील फेऱ्यात वाढ होणार असून ४० ऐवजी ६० फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे येथील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मात्र लोकल वाढी संदर्भात कोणताही प्रस्ताव मध्य रेल्वे कडून तयार करण्यात आलेला नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
लवकरच उरण बेलापूर /नेरूळ लोकलच्या फेऱ्या वाढणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. उरणचे आमदार महेश बालदी यांनी नुकताच दिल्ली येथे जाऊन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत उरण ते बेलापूर/नेरुळ मार्गावरील लोकलच्या फेऱ्यात वाढ करण्याची तसेच लोकलच्या प्रवाशांच्या इतर समस्या सोडविण्याची मागणी केली होती. या बैठकीत वैष्णव यांनी सकारात्मक भूमिका घेत येत्या काळात यामार्गावरील दहा फेऱ्या वाढविण्याचे आश्वासन दिले होते.
याची लवकरच अंमलबजावणी होईल अशी माहीती आ. बालदी यांनी दिली होती. त्यासाठी बालदी यांनी मध्य रेल्वे विभागाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. तर उरण ते बेलापूर/नेरूळ या महत्त्वपूर्ण रेल्वे मार्गाच्या संदर्भात केंद्रातील संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रवाशांच्या सोयीसाठी लवकरच सध्याच्या ४० फेऱ्यांऐवजी ६० फेऱ्या सुरू करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहे. यामुळे उरण व नेरूळ परिसरातील प्रवाशांचा दैनंदिन प्रवास अधिक सुखकर, सोयीस्कर आणि वेळेवर होण्यास मदत होणार आहे.
या बैठकीत रेल्वेमार्ग, फेऱ्या वाढविण्याबाबतच तसेच या मार्गावरील प्रवाशांना भेडसावणाऱ्या इतर प्रश्नांवरही सविस्तर आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली. याचे स्टेशनवरील सुविधा, वेळापत्रकातील नियमितता, तांत्रिक अडचणी आणि स्थानिक गरजांबाबत मांडणी करून त्यांचे निराकरण करण्यासाठी लवकरच ठोस पावले उचलली जाणार आहेत. उरण-नेरूळ परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असून या निर्णयामुळे स्थानिक प्रवाशांना दिलासा मिळणार असून उरणच्या लोकल रेल्वे सेवेत लक्षणीय सुधारणा होणार आहे.
उरण ते बेलापूर/नेरुळ या मार्गावरील रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन केंद्रीय रेल्वे मंत्री यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात उरणच्या जनतेला दिले होते. दिवसेंदिवस प्रवाशांची वाढती लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासन हा निर्णय घेणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे ऑक्टोबरमध्ये वार्षिक वेळापत्रक बदलत असून, हा बदल नियोजित असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. नेरूळ ते उरण दरम्यान गर्दीच्या वेळी अंदाजे एक तास गर्दी नसलेल्या वेळी अंदाजे दीड अंतराने धावतात. वाढीव सेवेमुळे दोन लोकल गाड्यांमधील अंतर कमी होईल. गरज पडल्यास भविष्यात गाड्यांच्या फेऱ्या दुप्पटीने वाढवण्याची शक्यता आहे.
मध्य रेल्वे कडून उरण ते नेरुळ/बेलापूर दरम्यानच्या लोकल वाढीचा निर्णय घेण्यात आलेला नाही. अशी माहीती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी दिली आहे.