लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : रस्त्याच्या दुतर्फा उभी केलेली बेकायदा अवजड वाहने, काही वाहनांच्या कंटेनर्समध्येच सुरू असलेले बेकायदा व्यवसाय, जागोजागी झालेली अतिक्रमणे, पदपथांवर उभारलेल्या अनधिकृत टपऱ्या आणि त्या जोडीला अस्वच्छता, दुर्गंधी, कचऱ्याचे साम्राज्य. तुर्भे परिसरातील मॅफको भागात असलेल्या शीतगृह परिक्षेत्रातील हे दृश्य देशात स्वच्छतेच्या आघाडीवर पहिल्या क्रमांकाचे स्वप्न पाहणाऱ्या नवी मुंबई महापालिका हद्दीतीलच आहे का, असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. या भागातील काही लघुउद्योजकांनी महापालिकेच्या स्थानिक प्रभाग समिती कार्यालयात वारंवार तक्रारी करूनही या भागाकडे कोणतीही प्रशासकीय यंत्रणा ढुंकूनही पाहायला तयार नाही हे विशेष.

वाशी आणि तुर्भेच्या वेशीलगत असलेल्या मॅफको बाजारास लागूनच गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर शीतगृहे उभी राहिली आहेत. तुर्भे सेक्टर १८ चा हा संपूर्ण परिसर नवी मुंबई महापालिका हद्दीत मोडतो. लगतच कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत येणारी कृषी मालाची घाऊक बाजारपेठही आहे. त्यामुळे शीतगृह, राज्यातील बड्या सहकारी समूहाची दूध साठवणुकीची केंद्रे तसेच काही लघुउद्योजकांचे कारखानेही या भागात उभे राहिले आहेत. त्यामुळे व्यापारी क्षेत्र येथे विकसित होत असताना या संपूर्ण पट्ट्याला गेल्या काही काळापासून अतिक्रमण, अस्वच्छता आणि बेकायदा उद्योगांचा विळखा पडू लागल्याने नवी मुंबई महापालिकेचे प्रशासन याकडे डोळेझाक कसे करते याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आणखी वाचा-सिडको वसाहतींत पाण्यावाचून हाल, जलवाहिनी फुटल्याने शटडाऊन लांबला

मॅफको बाजार परिसरात झालेल्या अतिक्रमणे तसेच शीतगृहांच्या वाढीव बांधकामांना नोटिसा बजाविण्याची कार्यवाही सुरू आहे. स्वच्छतेच्या बाबतीत महापालिका खबरदारी घेत आहे. रस्त्यावरील बेकायदा दुकाने हटवण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. स्वच्छतेच्या बाबतही विविध प्रयत्न करण्यात येत असून येथील काही व्यावसायिकांना वारंवार सूचना केल्या आहेत. -भरत धांडे, साहाय्यक आयुक्त, तुर्भे विभाग

कंटेनरमध्येच व्यवसाय

या संपूर्ण परिसरात अवजड वाहनांच्या दुतर्फा मोठ्या रांगा पाहायला मिळतात. येथील शीतगृहांच्या बाहेर बेकायदेशीरपणे लहान-लहान उद्योग सुरू झाले आहेत. शीतगृहांच्या बाहेर पदपथावर काही ठिकाणी लहान गाड्यांमध्येच खाद्या विक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. बिनधोकपणे सुरू झालेल्या या बेकायदा हॉटेल व्यवसायाकडे महापालिकेचे विभाग कार्यालय ढुंकूनही पाहात नाही असे येथील काही उद्योजकांचे म्हणणे आहे.

आणखी वाचा-पनवेल शहरात एकाच रात्री सात दुकाने फोडली

राज्यभरात लोणची, मसाले विक्रीचा मोठा ब्रँड असलेल्या एका उद्योजकाने तुर्भे विभाग कार्यालयात गेली दोन वर्षे यासंबंधी पाठपुरावा सुरू केला आहे. मात्र या उद्योजकाच्या तक्रारींनाही केराची टोपली दाखवली गेली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जागोजागी कचऱ्याचे ढीग

केंद्राच्या स्वच्छ शहर अभियानात नवी मुंबईचा पहिला क्रमांक यावा यासाठी महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र या अभियानाचा कोणताही मागमूस शीतगृह पट्ट्यात दिसत नाही. बेकायदा व्यवसाय आणि अस्वच्छतेचे आगार येथे निर्माण झाले आहे. जागोजागी पडलेला कचरा, कचºयाचा ढीग यामुळे या ठिकाणी महापालिकेची यंत्रणा काम करते की नाही असा प्रश्न पडतो. तसेच येथे काही व्यावसायिकांनी जागा बळकावल्या आहेत.