नवी मुंबई : राज्य सरकारच्या पणन विभागाने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) प्रशासनात मोठा फेरबदल केला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ. पी.एल.खंडागळे यांची तडकाफडकी बदली करत त्यांच्या जागी छत्रपती संभाजीनगर सहकारी संस्थेचे सहनिबंधक शरद जरे यांना पदोन्नती देत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव करण्यात आले आहे.
खंडागळे यांची नियुक्ती आता पुण्यातील सहकारी पतसंस्थेत अपर निबंधक म्हणून करण्यात आली आहे. शरद जरे यांनी गुरुवारी मुंबई एपीएमसीच्या सचिव पदाची सूत्रे हाती घेतली असून, बाजार समितीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून डॉ. खंडागळे यांचे नाव बाजार समितीतील गैरव्यवहार आणि अनियमिततेच्या प्रकरणांशी जोडले जात होते. संचालक मंडळाशी हातमिळवणी करून बाजार समितीतील व्यवहारांकडे सचिवांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळेच बाजार समितीच्या कारभारात अनियमितता झाल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते. बाजार समितीतील प्रलंबित प्रकल्प, रखडलेला पुनर्विकास, बाजार आवारातील रस्ते आणि गटारांचा निकृष्ट दर्जा, फळ बाजरातील थेट सेस आकारणीमुळे झालेले बाजार समितीचे नुकसान आणि शीतगृहांमधील अनियमित कारभारासंदर्भात अनेक तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पणन विभागाने त्यांच्या बदलीचा निर्णय घेतल्याने एपीएमसीच्या कारभारात शिस्त आणण्याचा प्रयत्न पणन विभागाकडून झाल्याची चर्चा बाजार समितीत रंगली आहे.
दरम्यान, शरद जरे यांची ही पदोन्नती सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील काही प्रलंबित प्रकरणांच्या निकालांच्या अधीन राहणार असल्याची अट शासनाने ठेवली आहे. तसेच ही तदर्थ पदोन्नती असल्याने, शासनाला ती कधीही मागे घेण्याचा अधिकारही राखून ठेवण्यात आल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
लवकरच ‘राष्ट्रीय बाजार’
राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार राज्यातील प्रमुख बाजारपेठांना लवकरच ‘राष्ट्रीय बाजार’ चा दर्जा देण्यात येणार आहे. त्यात मुंबई एपीएमसीचे नाव अग्रस्थानी आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर पणन विभागाकडून प्रशासन पातळीवर करण्यात आलेले हे बदल महत्त्वाचे मानले जात असून येत्या काळात मुंबई एपीएमसीला ‘राष्ट्रीय बाजार’ घोषित करण्याच्या कामाला लवकरच गती मिळणार असल्याची शक्यता आहे.
