पनवेल : अटल सेतूवरील धुलीकणांच्या समस्येमुळे मुंबई महानगर रस्ते विकास मंडळाच्या सूचनेनंतर पनवेल व उरण तालुक्याच्या वेशीवरील १८ क्वॉरी, क्रशर प्लान्ट व खदाणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) नियम पाळत नसल्याने बंद केल्या होत्या. बंद झालेल्या १८ पैकी २ क्वॉरी मालकांनी एमपीसीबीने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करण्यासाठी संबंधित ठिकाणी उपाययोजना बसविल्याने एमपीसीबीच्या अधिका-यांनी त्याबाबतची खात्री केल्यावर या क्वॉरी सूरु करण्यासाठी अहवाल दिला आहे. त्यामुळे एमपीसीबीने रायगड जिल्हाधिका-यांना १८ पैकी २ क्वॉरी सूरु करण्याच्या सूचना दिल्या. एमपीसीबीने तालुक्यातील सर्वच खदाणी, क्वॉरी, क्रशर प्लान्ट यांना हे नियम का पाळायला सक्ती केली नाही असा प्रश्न विचारला जात आहे.
पनवेल तालुक्यामध्ये ८० हून अधिक क्वॉरी, खदाणी, क्रशर प्लान्ट आहेत. अटल सेतूवर धुलीकणांचा त्रास जाणवला म्हणून एमएसआरडीसी प्रशासनाने गंभीर दखल घेतली. अटल सेतूलगतच्या १८ खनिकर्म करणा-या प्रकल्पांचे काम थांबविण्यात आले. या प्रकल्प चालकांनी जोपर्यंत पर्यावरणाला बाधा होऊ नये यासाठीची उपाययोजना प्रकल्पात लागू करत नाही तोपर्यंत या प्रकल्पांला ठोकलेले सील खोलायचे नाही असा ठाम पवित्रा एमपीसीबी व रायगड जिल्हा प्रशासनाने घेतला.
हेही वाचा…देशातील पहिल्या प्रशिक्षण केंद्राची निविदा २३ फेब्रुवारीला, केंद्रामुळे कळंबोलीचे महत्व वाढणार
एमपीसीबीने क्रशर प्लान्ट, खदाणी, क्वॉरी असे खनिकर्म सूरु करण्यासाठी १० अटी प्रकल्पचालकांना पाळण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामध्ये प्रकल्पांशेजारी उंच पत्रे लावावेत, प्रकल्पाच्या आतील बाजूस धुलीकण कमी उडावे यासाठी पाण्याचे फवारे सूरु करावेत, अगदी उंच ठिकाणी धुलीकण प्रकल्पाबाहेर जाऊ नये यासाठी जाळ्या बसविणे, प्रकल्पातून निघणा-या गाड्यांच्या येजा करण्याच्या ठिकाणी पाण्याच्या फवारा मारावा अशा विविध महत्वाच्या १० अटींचे पालन क्वॉरी मालकांना यापुढे करावे लागणार आहे.
परंतू अटलसेतू लगत असणा-या १८ क्वॉरी प्रकल्पांसोबत तालुक्यातील इतर प्रकल्पातून प्रदूषण खालावत नाही का, एमपीसीबी प्रशासनाने तालुक्यातील ६० हून अधिक प्रकल्पांना हे नियम पाळण्यासाठी का प्रकल्पाला सील ठोकण्याचे कठोर पाऊले उचलली नाहीत असा प्रश्न विचारला जात आहे. पनवेल तालुक्यातील अनेक क्वॉरी या स्वराज कंपनी आणि राजकीय पुढारी व त्यांच्या नातेवाईकांच्या मालकीच्या असल्याने शासनातील अधिका-यांचा याकडे कानाडोळा होत आहे. प्रदूषण मंडळातील वरिष्ठ अधिकारी एकाच पनवेल तालुक्यातील एकच कामाची पद्धत अवलंबणा-या प्रकल्पांना वेगवेगळा न्याय लावत असल्याने एमपीसीबीच्या मुंबईच्या शीव येथील कार्यालयातील कारभाराविषयी साशंकता निर्माण झाली आहे. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे एमपीसीबीचे आदेश आल्यानंतर लवकरच तालुक्यातील १८ पैकी दोन क्वॉरी प्रकल्प सूरु होतील असे महसूल विभागाच्या सूत्रांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगीतले.