नवी मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातून निघालेल्या आंदोलनकर्त्यांचा लोंढा नवी मुंबईमार्गे मुंबईकडे रवाना होणार आहे. गुरुवार (२८ ऑगस्ट) मध्यरात्रीपासून आंदोलक नवी मुंबईत दाखल होऊ लागले असून, शुक्रवारी पहाटेपर्यंत मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते येण्याची शक्यता आहे.
या सर्व आंदोलनकर्त्यांच्या राहण्या-जेवणाची जबाबदारी सकल मराठा समाजाने स्वीकारली आहे. वाशी एपीएमसी कांदा-बटाटा बाजार परिसरातील लिलाव गृहात मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली असून, येथे जेवण, न्याहारी, पाणी आणि स्नानगृहाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याकरिता एपीएमसी प्रशासन आणि पोलीस यंत्रणेकडून सहकार्य मिळत आहे. मात्र नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको प्रशासनाकडून अद्याप कोणतेही सहकार्य न मिळाल्याने सकल मराठा समाजाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. “हे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे की शासनाचा डाव?” असा सवाल याप्रसंगी सकल मराठा समाज, नवी मुंबईकडून उपस्थित करण्यात आला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आझाद मैदानावरील आंदोलनाला मुंबई पोलिसांनी सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातून आंदोलक मोठ्या संख्येने नवी मुंबईत दाखल होत आहेत. समाजमाध्यमांच्या माध्यमातून आंदोलक आपला प्रवास, हवामान, वाहतूक कोंडी आदी माहिती सतत शेअर करत असून, “कितीही अडचणी आल्या तरी मुंबई गाठणारच” असा उत्साह आंदोलनकर्त्यांमध्ये दिसून येत आहे.
आंदोलकांची गैरसोय होऊ नये म्हणून सिडकोने वाशीतील एक्झिबिशन सेंटर आणि नेरुळमधील आगरी-कोळी भवन तातडीने खुले करावे, तसेच पिण्याचे पाणी आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी सकल मराठा समाजाकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात २० ऑगस्ट पासून महापालिका, सिडको, ठाणे जिल्हाधिकारी आणि इतर विभागांना निवेदन देण्यात आले होते. तरीही महापालिका आणि सिडकोकडून अद्याप कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आंदोलक नाराजी व्यक्त करत आहेत.
दरम्यान, माथाडी नेते व आमदार शशिकांत शिंदे यांच्यासोबत सकल मराठा समाजाची चर्चा झाली असून, एपीएमसीतील नियोजनाबाबत संवाद साधण्यात आला आहे. या संदर्भात एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात सकल मराठा समाजाने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेनंतर नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांची सकल मराठा समाज संयोजक समितीशी थोड्याच वेळात भेट होणार असल्याची माहिती समाजाकडून देण्यात आली आहे.