नवी मुंबई : नेरूळमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या भोवती महापालिकेने पुन्हा उभारलेल्या हिरव्या कापडी जाळीविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. गनिमिकाव्याने स्मारक पुन्हा खुले करण्याचा इशारा मनसेने प्रशासनाला दिला आहे. त्यानंतर आता या प्रकरणी राजकीय दबाव वाढवण्यासाठी मनसेकडून जुन्या शिवसैनिकांना म्हणजेच राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व वनमंत्री गणेश नाईक यांना साद घातली आहे. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी दोन्ही नेत्यांना उद्देशून लिहिलेल्या खुल्या पत्रातून प्रश्नांची सरबत्ती लावत स्मारकाबाबत जाब विचारला आहे.

काळे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, गेली चार महिने महाराजांचा सिंहासनारूढ पुतळा मळक्या कापडात गुंडाळून अस्वच्छ स्थितीत ठेवण्यात आला. “ना दिवा, ना हार… महाराजांना अशा अवस्थेत ठेवण्याचा संताप शिवसैनिक म्हणून आपल्याला आला नाही का?” असा थेट सवाल त्यांनी दोन्ही मंत्र्यांना केला आहे. पुतळ्याचे लोकार्पण मंत्र्यांच्या वेळेवर अवलंबून ठेवणे म्हणजे शिवछत्रपतींचा अवमानच असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पत्रात पुढे लिहिल्यानुसार, “अशा अवस्थेत असलेल्या स्मारकाची स्वच्छता करून, विधिवत पूजा करून वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि ठाकरे कुटुंबातील तिसऱ्या पिढीचे नेतृत्व असलेल्या अमितजी ठाकरेंनी स्मारक सर्वांसाठी खुले केले. याचा शिवसैनिक म्हणून आपणास अभिमान नाही का? उलट त्याच रात्री तीन वाजता पोलिस बंदोबस्तात स्मारक पुन्हा बंदिस्त केले गेले. हे कोणाच्या आदेशावरून? ही मुघलाई नाही का?” असा थेट सवाल काळे यांनी दोन्ही मंत्र्यांना विचारला आहे.

“याचा जाब आपण विचारणार आहात का?” असे म्हणून काळेंनी आपल्या पत्राच्या माध्यमातून दोघांनाही या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

“हे वाचल्यानंतर आपल्या मनातील सच्चा शिवसैनिक पेटून उठेल, अशी आम्हाला आशा आहे. आपल्या पदाचा उपयोग करून हे कापड एका दिवसात काढण्याचे आदेश द्यावे,” अशी मागणी काळे यांनी केली आहे. तसेच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या सोयीने उद्घाटन होईपर्यंत स्मारक झाकून ठेवले जाणार असेल आणि तोपर्यंत महाराजांच्या स्मारकासमोर दिवा, पुष्प आणि स्वच्छता केली जाणार नसेल तर ते राज्याचे दुर्दैव ठरेल, असा आरोपही काळेंनी केला आहे.

पत्राच्या शेवटी “आपल्यातील शिवसैनिक अजून जिवंत आहे हे दाखवण्याची हीच ती योग्य वेळ… जय शिवराय!” अशा शब्दांत दोन्ही नेत्यांना मनसेनेकडून आवाहन करण्यात आले आहे.

मनसेच्या या तीव्र भावनिक साद घातलेल्या पत्रानंतर महापालिका, स्थानिक प्रशासन आणि शिंदे-नाईक गटाची काय प्रतिक्रिया येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.