पनवेल : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना खड्ड्यांमुळे आणि रस्त्यांच्या कामांमुळे त्रास होऊ नये म्हणून सात महिन्यांपूर्वी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला होता. मात्र पाहणीनंतर पावसाळा आला आणि पावसाळ्यात पुन्हा या महामार्गाचे काम रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात ढिम्म झाले. अजूनही महामार्गाचे काम पूर्ण झालेल्या ठिकाणी पथदिवे नाहीत. तसेच कॉंक्रीटचा रस्ता संपल्यानंतर नाल्यापर्यंतच्या भागावर माती असल्याने पावसाळ्यात याच मातीवर अनेक वाहनांची चाके रुतली आहेत.

सरकारी प्रशासनाकडून रस्त्याच्या कामाची प्रगती जाणून घेण्यासाठी पुन्हा मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे गुरुवारी पनवेलमधील पळस्पे ते रत्नागिरी (हातखांबा) या पल्ल्यावरील महामार्गाची पाहणी करणार आहेत. विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यात हेच मंत्री याच महामार्गाची पाहणी दौरा करून त्यांनी जानेवारी २०२६ पर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण होईल, असे जाहीर केले. मात्र गेल्या सात महिन्यातील कामाची प्रगती ढिम्म असल्याने अजून किती मुहूर्त मंत्र्यांकडून या महामार्गाच्या पूर्णत्वासाठी सांगितले जातील, असा संतापजनक प्रश्न कोकणवासीयांकडून विचारला जात आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच अटल सेतूवरून आलेल्या वाहनांना थेट पुण्यात दीड तासात पोहचण्यासाठी नव्या रस्त्याची आखणी करत असल्याची घोषणा केली. मात्र गेल्या १२ वर्षात मुंबई गोवा महामार्गाचे काम केंद्र व राज्य सरकार पूर्ण करु शकले नाही. कोकणवासियांनी याविषयी अनेक आंदोलने केली. कोकणाचे प्रवेशव्दार असणाऱ्या पनवेलमधील जेएनपीटी महामार्गावरील पळस्पे उड्डाणपुलावरील खड्डे तसेच पळस्पे येथील पुलाखालील खड्डे दृष्टिआड व्हावेत अशा प्रकारे मंत्र्यांच्या दौऱ्याची आखणी केली जाते. तसेच रायगड जिल्ह्यातील माणगाव, कोलाड, रोहा या तालुक्यांसह रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर ते लांजा या पल्ल्यावर अक्षरशः रस्त्यामुळे वाहतूक कोंडी आणि उंचसखल खड्यांमुळे मोटारीतील प्रवाशांचे कंबरडे मोडत आहेत. पाहणी करण्यासाठी मंत्री येणार असे समजल्यास महामार्गावरील खड्यांची तात्पुरती डागडुजी करून त्यावर मुलामा दिला जातो. २१ दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी चाकरमानी सुखरूप आणि विना वाहनकोंडीचे गावी जावेत यासाठी मंत्री काय सूचना देतात याकडे कोकणवासियांचे लक्ष लागले आहे.