नवी मुंबई – लोकनेते दि. बा. पाटील ह्यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्याच्या मागणीच्या अनुषंगाने केंद्र सरकारचे लक्ष्य वेधण्यासाठी भूमिपुत्रांचा आणि दि. बा समर्थकांचा नवी मुंबई विमानतळावर ६ ऑक्टोबर रोजी विराट धडक मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.

बुधवार दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजी भिवंडी लोकसभेचे आणि भूमिपुत्रांचे खासदार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे ह्यांनी पत्रकार परिषद घेत नवी मुंबई विमानतळ सुरू होण्यापूर्वी विमानतळाला राष्ट्रीय लोकनेते दि.बा. पाटील साहेबांचे नाव द्यावे आणि तसे अधिकृत नोटिफिकेशन काढून घोषित करावे, अन्यथा सोमवार दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ रोजी नवी मुंबई विमानतळावर भूमिपुत्रांचा आणि दि.बा समर्थकांचा विराट असा मोर्चा निघणार, असा इशारा केंद्र सरकारला देण्यात आला आहे .

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील पहिल्या फळीचे नेते, कुळ कायद्याची अंमलबजावणी करून संपूर्ण महाराष्ट्रातल्या कसणार्‍या शेतकर्‍यांना जमिनीचे मालक बनवणारे नेते, जमिनीच्या बदल्यात जमीन हा कायदा प्रस्थापित करणारे, नवीन भूसंपादन पुनर्वसन आणि पुनरस्थापना कायद्याची पायाभरणी करणारे नेते, स्त्रिभृण हत्या विरोधी कायदा देशाला देणारे, ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात महाराष्ट्र आणि देशाचे नेतृत्व करणारे नेते, पाच वेळा आमदार, दोन वेळा खासदार तरी ही स्वतःचे घर न बांधू शकणारी निस्वार्थ व्यक्ती आणि त्यांच्या भूमीत होणार्‍या विमानतळाला त्यांचे नाव देण्यात दिरंगाई होत असेल तर ते कदापी खपून घेतले जाणार नाही असा इशारा खासदार सुरेश म्हात्रे ह्यांनी दिला आहे.

महाराष्ट्र सरकारने कॅबिनेट आणि विधिमंडळात प्रस्ताव मंजूर करून केंद्र सरकरकडे पाठवला आहे. महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावचे आम्ही समर्थन करत असून केंद्राने दिरंगाई करून महाराष्ट्राच्या सरकारच्या आणि जनतेच्या भावांनाचा अनादर करू नये असा इशारा ही ह्यावेळी देण्यात आला.त्यामुळे ६ ऑक्टोबर २०२५ पूर्वी सकारात्मक निर्णय झाल्यास जल्लोष करू अथवा नवी मुंबई विमानतळावर भूमिपुत्र आणि दि.बा समर्थक लाखोंच्या संख्येने धडकणार असा इशारा दिला आहे.

नवी मुंबईतील विमानतळाला दि बा पाटील पाटील यांचे नाव देण्यासाठी काही दिवसापूर्वीच नवी मुंबई विमानतळ परिसरात मोर्चा काढला होता. दुसरीकडे नवी मुंबई शहरात पामबीच मार्ग तसेच अंतर्गत रस्त्यावर नवी मुंबई विमानतळाकडे असे दिशादर्शक फलक नवी मुंबई महापालिकेतर्फे लावण्यात येत होते.

त्याला नवी मुंबईतील स्थानिक भूमीपुत्रांनी विरोध करत पामबीच मार्ग तसेच सारसोळे जंक्शन येथील फलक उखडून काढले होते. त्यामुळे आता खासदार सुरेश म्हात्रे यांनी ६ ऑक्टोंबर पूर्वी नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव न दिल्यास आंदोलनाची हाक दिली असल्याची माहिती समाजाचे आगरी कोळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश पाटील यांनी दिली आहे.