नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) परिसरात अतिक्रमणाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. फेरीवाल्यांनी संपूर्ण बाजारपेठ परिसर गिळंकृत केला आहे. भाजीपाला, फळ, धान्य आणि मसाला बाजारांच्या वेशीवर अनधिकृत फेरीवाले मोठ्या प्रमाणात बसू लागल्यामुळे नियमित व्यापाऱ्यांसह वाहनधारकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मुंबई एपीएमसी ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. दररोज हजारो शेतकरी, व्यापारी आणि ग्राहक येथे व्यवहार करतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना आणि बाजार प्रवेशद्वारांवर अनधिकृत फेरीवाल्यांची गर्दी वाढली आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत ही गर्दी सुरू असल्याने या परिसरात वाहतूक कोंडी, कचरा आणि अस्वच्छतेची समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहे. स्थानिक व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रशासनाने अनेक वेळा कारवाई केल्याचे सांगितले जाते; परंतु ती केवळ दिखाऊ असते. काही तासांतच हे फेरीवाले पुन्हा त्याच ठिकाणी येऊन बसतात. फेरीवाल्यांनी बाजाराच्या प्रवेशद्वारावरील मुख्य रस्त्यावर ठाण मांडल्याने रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे एपीएमसी वाहतूक पोलीस स्थानकापासून ते माथाडी भवन आणि माथाडी कामगार पुतळ्यापासून ते जलाराम मार्केट चौकापर्यंत नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामनाही करावा लागत आहे.

स्थानिकांच्या आरोग्याला धोका

अनेकदा हे फेरीवाले आपला उरलेला माल रस्त्याच्या कडेला फेकून देत असल्याने एपीएमसी परिसरातील गटारांमध्ये हा सर्व कचरा अडकून राहतो. परिणामी, पावसाळ्यात भाजीपाला व फळ बाजाराच्या प्रवेशद्वारावर पाणी तुंबते. यामुळे परिसरालाही बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. परिसरात अस्वच्छतेमुळे दुर्गंधी वाढून डासांचे प्रमाणही वाढले आहे तर स्थानिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. फेरीवाल्यांसाठी पर्यायी ठिकाणे उपलब्ध करून देऊन बाजार परिसरातून त्यांना हटविण्याची मागणी व्यापारी संघटनांनी केली आहे.

फेरीवाल्यांवर प्रशासनाकडून वारंवार कारवाई केली जात आहे. मात्र फेरीवाल्यांची वाढती संख्या आणि प्रशासनाकडे असलेले मर्यादित मनुष्यबळ हा चिंतेचा विषय आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत कारवाई वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच,पथकाच्या वेळेचे योग्य नियोजन करून शनिवार-रविवारी अधिक कठोरपणे फेरीवाल्यांवर लक्ष ठेवले जाईल अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.- सागर मोरे, विभाग अधिकारी, तुर्भे विभाग