उरण : जेएनपीए बंदर आणि उरणला जोडणाऱ्या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरून वाहत्या पाण्यातून धोकादायक प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे हे राष्ट्रीय महामार्ग की जलमार्ग असा प्रश्न आता प्रवासी,वाहनचालक आणि नागरिकांकडून केला जात आहे. तीन हजारा पेक्षा अधिक हजार कोटींचा खर्च करून जेएनपीए -उरणला जोडणारे जेएनपीए ते पळस्पे आणि जेएनपीए ते आम्र मार्ग (नवी मुंबई) या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३४८ व ३४८ अ यांची उभारणी करण्यात आली आहे. या दोन्ही मार्गाच्या आजूबाजूला डोंगर परिसर आहे. या डोंगरावरून पावसाळ्यात वाहणारे ओढे हे या मार्गातून वाहत आहेत. मात्र या डोंगरावरील पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे नियोजन रस्ते उभारणी करतांना न केल्याने हे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. या वाहत्या वाहनांतून धोकादायक रीत्या प्रवासी व मालवाहतूक वाहनांना धोकादायक पणे मार्गक्रमण करावे लागत आहे.

या मार्गावरील जासई,गव्हाण फाटा(जे डब्ल्यू आर गोदाम)उलवे नोड,उड्डाणपूल आदी ठिकाणी महामार्गात पाणी साचत आहे.या रस्त्यांची जबाबदारी ही भारतीय रस्ते विकास प्राधिकरण(एन एच आय)यांची आहे. यात प्रामुख्याने उरण – पनवेल मार्गावरील जासई उड्डाणपूलाच्या शंकर मंदीरा जवळ येथील डोंगरावरून येणारे धोधो पाणी वाहत आहे. याच जेएनपीए ते नवी मुंबईच्या आम्र मार्ग राष्ट्रीय महामार्गाच्या वाहत्या पाण्यातून वाहनांना मार्ग काढून प्रवास करावा लागत आहे. या डोंगरातील पाण्या बरोबर येणारा चिखलही मार्गावर वाहून येत असून या चिखलामुळे वाहनांना अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचआय)कडून या महामार्गाची उभारणी करण्यात आली आहे. उरण पनवेल मार्गावरील जासई शंकर मंदिरा नजीकच्या भागात डोंगर आणि दगड खाणी आहेत. या परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात डोंगरावर पडणारे पाणी वाहून येते. या वाहून येणाऱ्या पाण्याचा निचरा होत नसल्याने हे पाणी थेट रस्त्यातून वाहत आहे.

जुन्या राज्य महामार्गावर याच परिसरात रस्त्याला नदीचे स्वरूप येत होते. मात्र जवळपास ३ हजार कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या मार्गाची स्थिती दयनीय बनली आहे. यापूर्वी उरण पनवेल मार्गावरील जासई उड्डाणपूलाच्या दोन्ही सेवा मार्गावर दीड ते दोन फुटाचे साचले होते. हे पाणी गेले काही दिवसापासून मार्गावर पाणी कायम होते. त्यामुळे वाहन चालकांना या पाण्यातून मार्गक्रमण करावे लागत होते. या मार्गातील पाणी निचऱ्याची जबाबदारी कोणाची हा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र सध्या आता हा निचरा होणे सुरू झाली आहे.

जेएनपीए-नवी मुंबईला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने शंभर कोटी रुपये खर्चुन उभारलेल्या जासई उड्डाणपुलाच्या खालील दोन्ही बाजूच्या सेवा गुडघाभर पावसाचे पाणी साचत असल्याने हलक्या वाहनांसाठी धोकादायक ठरू लागले आहे. यामुळे वाहनचालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील पाणी निचरा गंभीर समस्या : हजारो कोटी रुपये खर्च करून प्रशस्त खड्डेमुक्त मार्ग बनविण्यात आले आहेत. मात्र या मार्गावरील पाणी आणि धूळ यांची समस्या कायम आहे. उरण पनवेल या मार्गावरून पावसात येणाऱ्या पाण्याचा निचऱ्याचे नियोजन झालेले दिसत नाही. या जासई,करळ, गव्हाण,दास्तान फाटा आदी ठिकाणी तसेच वहाळ कडे जाणाऱ्या उड्डाणपूलावर ही मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे काँक्रीटच्या या मार्गानाही खड्डे पडू लागले आहेत.

प्रवाशांची वाहने बंद होण्याच्या घटना : मार्गातील वाहत्या पाण्यामुळे छोटी,दुचाकी वाहने बंद पडत आहेत. त्यामुळे याचा त्रास येथील वाहनचालकांना बसत आहे. या संदर्भात एनएचआयचे अधिकारी यशवंत घोटकर यांच्याशी संपर्क साधला एन एच आय कडून मार्गातील पाणी काढण्यासाठी मशनरी आणि यंत्रणा राबविण्यात येत असून रस्तावर डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचा निचरा करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सततच्या पावसामुळे यात अडथळा निर्माण होत आहे. तर गव्हाण फाटा,जासई येथील पाणी काढण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.