पनवेल : रविवारी भर पावसात मोठ्या संख्येने विमानतळ प्रकल्पग्रस्त व बाधित शेतकरी पनवेल तालुक्यातील नांदगाव डोंगरावर एकत्र जमले आणि त्यांनी मानवी साखळी उभारून आपल्या मागण्यांचा ठोस आवाज बुलंद केला. काही दिवसांत सुरू होणा-या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामध्ये ज्यांच्या जमीनी संपादीत झाल्या आहेत, अशांना बाजूला सारून उलवे येथे राहणा-या मात्र मूळचा उत्तरप्रदेशातील तरूणाचे नाव बिव्हीजी कंपनीच्या प्रशिक्षण यादीत आल्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या संघटनेतील एका गटाने आक्रमक भूमिका घेत मानवी साखळीचे आंदोलन करून रोष व्यक्त केला. नोकरभरतीमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढल्याने प्रकल्पग्रस्त संतापले आहेत.
रविवारच्या आंदोलनाला भारतीय जनता पक्ष वगळता राजकीय पक्षाने पाठिंबा दिल्यााच दावा आंदोलक प्रकल्पग्रस्तांच्या गटाने केला आहे. ही मंडळी पूर्वी लोकनेते दि. बा. पाटील २७ गाव प्रकल्पग्रस्त समितीचा भाग होते. मात्र भाजपच्या पदाधिका-यांच्या एकाधिकार शाहीला वैतागून या प्रकल्पग्रस्तांनी विरोधाची मोट बांधली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, ही मागणी या आंदोलकांची असली तरी विमानतळ प्रकल्पातील विविध नोकर भरतीसाठी प्रशिक्षण यादीमध्ये ज्यांच्या जमिनींचे संपादन झाले. अशा गावातील प्रकल्पग्रस्तांना वगळून उरण, अलिबाग आणि पनवेल या तालुक्यांमधील गावातील तरुणांची नावे यादीत दिसू लागल्याने प्रकल्पग्रस्तांनी आश्चर्य व्यक्त केले.
इतर तालुक्यांसोबत उलवे येथे राहणारा मात्र मूळचा उत्तरप्रदेशातील असलेल्या अश्विन कृष्णकुमार गुप्ता याच्या नावामुळे ही यादी ज्यांच्या जमिनी या प्रकल्पात संपादित झाले त्यांना विश्वासात घेऊन तयार केली नसल्याचा आरोप प्रकल्पग्रस्त तरुणांकडून केला जात आहे. या प्रकारामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या एक गटाने या अन्यायाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.विमानतळाचा पहिला टप्पा सुरू होत आहे. दूसरी व तीसरी धावपट्टी येथे होत आहे. त्यामुळे ज्यांच्या जमिनीवर हे विमानतळ उभे राहत आहे अशा प्रकल्पग्रस्त व सातबा-यावर ज्यांच्या जमिनी आहेत अशांना प्राधान्याने काम मिळाल्यानंतर पनवेलमधील इतर प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य द्यावे अशी मागणी विमानतळ बाधित व प्रकल्पग्रस्त तरुणांनी यावेळी केली.
केंद्र सरकारने दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावे तसेच विमानतळ प्रकल्पासाठी जमीन दिल्यापासून आजवर शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळालेला नाही आणि रोजगाराची हमी पूर्ण करण्यात आलेली नाही, अशी खंत शेतकऱ्यांनी आंदोलना दरम्यान व्यक्त केली. अदानी कंपनीकडे विमानतळाच्या संचलनाची जबाबदारी सोडविल्यानंतर अदानी कंपनीने बीव्हीजी उद्योग समुह आणि ओसीएस या कंपनींना विमानतळातील सेवा क्षेत्रातील इतर कामाचे कंत्राट सोपवले आहेत. मात्र या कंत्राटदार कंपन्यांकडून रोजगार देताना ज्यांच्या जमीनी या प्रकल्पासाठी संपादित केल्या आहेत अशा प्रकल्पग्रस्तांना रोजगाराचे प्राधान्य देण्याऐवजी इतरांना रोजगार देत असल्याचा आरोप मानवी साखळीवेळी प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.
याशिवाय सिडको महामंडळाने प्रकल्पग्रस्तांना विमानतळ कंपन्यांमध्ये शेअर्स देण्याचे आश्वासन अकरा वर्षांपूर्वीच दिले होते. परंतु आजतागायत संबंधित शेअर देण्याविषयी प्रक्रिया सुरू झाली नसल्याकडे प्रकल्पग्रस्तांनी लक्ष वेधले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प असला, तरी ज्यांच्या जमिनीवर हा प्रकल्प उभारला जात आहे त्या शेतकऱ्यांचे हक्क डावलले जात असल्याचे सांगताना प्रकल्पग्रस्तांना त्यांचा हक्क न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा यावेळी दिला.
याबाबत बीव्हीजी कंपनीचे व्यवस्थापक विपेन टिक्कू यांनी दिलेल्या स्पष्टीकरणात, नवी मुंबई विमानतळ प्रकल्पामध्ये अद्याप कोणालाही नोकरीसाठी थेट नेमलेले नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. विमानतळ प्रकल्पातील कामामध्ये नेमताना पहिल्यांदा जे मूळ प्रकल्पग्रस्त आहेत त्यांनाच प्राधान्याने नेमण्यात येईल असेही टिक्कू यांनी स्पष्ट केले आहे. प्रत्यक्ष नेमणूकीपूर्वी संबंधितांना त्यांच्या कामाचे प्रशिक्षण देण्यासाठी कंपनीने प्रकल्पग्रस्तांना नावे नोंदवून त्यांची मूळ कागदपत्रे लवकरात लवकर कंपनीच्या कार्यालयाकडे जमा करण्याचे आवाहन केले आहे. चारित्र्य पडताळणीसाठी जी कागदपत्र आवश्यक आहे अशांची मागणी संबंधितांकडे केली आहे अनेकांनी अजूनही कागदपत्रे दिली नसून त्यांनी तातडीने कागदपत्र दिल्यावरच प्रशिक्षणाची पुढील प्रक्रिया पूर्ण होईल असेही व्यवस्थापक टिक्कूू म्हणाले.