नवी मुंबई महापालिकेची कारवाई

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई, ठाणे, पनवेलसह उर्वरित महाराष्ट्रातील रुग्णांना कमी पैशांत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणाऱ्या नेरुळ येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. नवी मुंबई महापालिकेने रुग्णालयाविरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला आहे.

नवी मुंबईतील रुग्णांसह ठाणे, पनवेल, उरण व उर्वरित महाराष्ट्रातील रुग्ण डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचारांसाठी येत असतात. खासगी असो वा सार्वजनिक, सर्वच रुग्णालयांना दर तीन वर्षांनी संबंधित महापालिकेच्या आरोग्य विभागात पुनर्नोदणी करणे बंधनकारक असते. नवी मुंबई महापालिकेतही हा नियम लागू असल्याने डी. वाय. पाटील रुग्णालयातर्फे पालिकेकडे पुनर्नोदणीसाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, त्याची मुदत मार्चमध्येच संपली होती. त्यामुळे पालिकेने ३० सप्टेंबर रोजी रुग्णालयाला नोटीस बजावून एक महिन्याची मुदत देत विहित मुदतीत योग्य कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले होते. परंतु प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि अग्निशमन विभाग यांची ना हरकत प्रमाणपत्रे सादर करण्यास रुग्णालय प्रशासन अपयशी ठरल्याने महापालिकेने रुग्णालयाचा परवाना रद्द केला. तसेच बॉम्बे नर्सिग होम रजिस्ट्रेशन (सुधारित) कायदा २००५ मधील कलम ३ नुसार व पालिका आदेशाचे पालन न केल्यामुळे भादंवि कलम १८८ तसेच इतर प्रचलित कायद्यानुसार रुग्णालयावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

पालिकेतर्फे आवाहन

दरम्यान, डी. वाय. पाटील रुग्णालयाचा परवाना रद्द करण्यात आल्याने नागरिकांनी या रुग्णालयात भरती होऊ नये, असे आवाहन नवी मुंबई महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

‘कोणतेही बेकायदेशीर काम केलेले नाही’

डी वाय पाटील रुग्णालयाने तांत्रिक बाबींची पूर्तता केली असून कोणतेही बेकायदेशीरपणे काम केलेले नाही. २८ नोव्हेंबर रोजी त्यांची सुनावणी होणार होती; पण त्याआधीच पालिकेने कारवाई केली आहे. अद्यापपर्यंत डी वाय पाटील रुग्णालयाला लेखी स्वरूपात माहिती मिळाली नसून कायदेशीरदृष्टय़ा त्याची पूर्तता करण्यात येईल. २००४ पासून हे रुग्णालय व्यवस्थित सुरू आहे. पालिकेने एलबीटी, अग्निशमन, प्रदूषण नियंत्रण याबद्दल नोटीस दिली होती. रुग्णालयाने एलबीटीचे पैसे भरले असून अग्निशमनचेदेखील ना-हरकत प्रमाणपत्र घेतले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे २०१५ मध्ये आम्ही परवानगीचे पैसेदेखील भरले आहेत. एचटीपी प्लॅण्ट असणारे नवी मुंबईतील एकमेव रुग्णालय असल्याचे डी. वाय. पाटील समूहाचे संचालक प्रभाकर भागवत यांनी स्पष्ट केले आहे.

डी. वाय. पाटील रुग्णालयाला ३१ मार्च २०१६ रोजी आवश्यक कागदपत्रे सादर करून पूर्तता करण्यासाठी सांगितले होते. त्यानंतरदेखील त्यांना नोटीस बजावून संधी देण्यात आली. त्यानंतरही नोटीस देण्यात आली होती. ४ ऑक्टोबर रोजी नवीन रुग्णभरती करण्यात येऊ नये व रुग्णालय चालविणे बंद करण्याबाबत कळविले होते. तरीदेखील नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. – रमेश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई महापालिका

 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai civic body lodges fir against dy patil hospital threatens to seal
First published on: 17-11-2016 at 02:10 IST