नवी मुंबई – गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून गणेशोत्सव सुनियोजितपणे पार पडावा या उद्देशाने नवी मुंबई पालिकेच्यावतीने विविध उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. यामध्ये रस्ते दूरूस्ती, मंडप परवानग्या, पाणी पुरवठा, वाहतूक नियोजन, खासगी वाहन सेवा, सीसीटिव्ही कॅमेरे असणार आहेत. नवी मुंबई पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यावतीने शासकीय प्राधिकरणे आणि श्रीगणेशोत्सव मंडळांच्या नियोजन बैठकीत यासंबंधीचे निर्देश देण्यात आले आहेत.

नवी मुंबई आधुनिक शहर म्हणून नावाजले जात असते. नवी मुंबईत श्रीगणेशोत्सव पर्यावरणपूरक आणि सुनियोजित साजरा व्हावा याकरिता महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यावतीने विविध निर्देश श्रीगणेशोत्सव मंडळांच्या नियोजन बैठकीत देण्यात आले आहेत. यामध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळांना देण्यात येणाऱ्या मंडप परवानगीसाठी १४७ अर्ज प्राप्त झाल्याची माहिती देण्यात आली.

मागील वर्षी मंजूरीचा आढावा घेऊन इतरही मंडळांनी परवानगी घ्यावी याबाबत आवाहन देखील करण्यात आले. त्याचप्रमाणे गणेशोत्सवासाठी मूर्ती आणतांना आणि विसर्जनासाठी जात असताना नागरिकांना त्रास होऊ नये यादृष्टीने रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच शहरातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा वाहनांचे पार्किंग होत असल्याने वाहतुकीला मोठया प्रमाणावर प्रतिबंध निर्माण होत असतो. याकरिता वाहतुक पोलीस विभागाचे सहकार्य घेऊन रस्ते वाहतुकीसाठी मोकळे राहतील अशाप्रकारे कार्यवाही कराण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले.

त्याचबरोबर, पाणी पुरवठा आणि स्वच्छतेबाबत नियोजनाचे आदेश दिले. तसेच निर्माल्याचे संकलनकरून विल्हेवाट करण्याच्या सूचना देण्यात आल्या. गणेशोत्सव सजावटीत पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करावा याविषयी व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच, गणेशोत्सव काळात सर्वत्र मोठया प्रमाणावर होर्डिंग, बॅनर लावून शहर विद्रूपीकरण केले जाते. याकरिता विभाग कार्यालयांनी गणेशोत्सव मंडळांना नियमानुसार परवानगी घेऊनच होर्डिंग / बॅनर लावण्याचे सूचित करावे असे निर्देशीत करण्यात आले. अनधिकृत बॅनरवर कारवाई केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले.

गणेशोत्सव कालावधीत मोठया प्रमाणावर नागरिक गावी जात असतात. याकरिता महामार्गांवर नागरिकांना सार्वजनिक वाहनांची वाट पाहावी लागते. नागरिकांचा हा त्रास वाचण्यासाठी बस डेपोच्या ठिकाणी ही खाजगी वाहने आल्यास नागरिकांना सोयीचे होईल हे लक्षात घेऊन त्याप्रकारे वाहतूक विभागाच्या पोलीसांच्या सहकार्याने नियोजन करण्याचेही आदेश देण्यात आले.

या बैठकीत अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे, शहर अभियंता शिरीष आरदवाड, वाहतूक पोलीस उपआयुक्त तिरुपती काकडे, परिमंडळ १ उपआयुक्त सोमनाथ पोटरे आणि परिमंडळ दोन उपआयुक्त संजय शिंदे, परिवहन व्यवस्थापक योगेश कडूसकर, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, अतिक्रमण उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड, घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त डॉ. अजय गडदे आणि स्मिता काळे तसेच सर्व कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

सीसीटिव्ही कॅमेरे

कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने गणेशमूर्ती विसर्जन स्थळांवर एचडी सीसीटिव्ही कॅमेरे असावे याबाबत दक्षता घेण्याचाही सूचना यावेळी देण्यात आल्या.