नवी मुंबई – इंडिया रेटींग अँड रिसर्च” (फिच) या राष्ट्रीय स्तरावरील अर्थविषयक मान्यताप्राप्त संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी विविध संस्थांचे पत मानांकन जाहीर करण्यात येते. यामध्ये मागील १० वर्षांप्रमाणेच या वर्षीही ” इंडिया डबल ए प्लस स्टेबल ” हे सर्वोत्तम पत मानांकन नवी मुंबई महानगरपालिकेस सन २०२४ -२५ या आर्थिक वर्षाकरीता जाहीर झाले आहे.
विशेष म्हणजे अशाप्रकारे आर्थिक सक्षमतेचे ‘डबल ए प्लस’ मानांकन सातत्याने ११ वर्षे मिळविणारी नवी मुंबई ही देशातील एकमेव महानगरपालिका आहे. देशातील निवासयोग्य शहरांमध्ये आघाडीवर असणा-या नवी मुंबई महानगरपालिकेने नागरिकांसाठी पुरविण्यात येणा-या सेवासुविधांच्या दर्जाकडे बारकाईने लक्ष देत नेहमीच दूरगामी दृष्टीकोन राखला आहे. महसूलविषयक जमा व खर्चाच्या बाबींकडेही काटेकोर लक्ष दिले आहे.
जमा – खर्चाचा योग्य ताळमेळ राखण्याकडे महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे बारकाईने लक्ष असून त्याला मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे यांच्या नियंत्रणाखाली संपूर्ण लेखा विभागाची सुयोग्य साथ लाभत आहे. त्यामुळेच हे सर्वोत्तम आर्थिक पत मानांकन याही वर्षी लाभले आहे. अशाप्रकारे सातत्याने पत मानांकन मिळविणे ही सर्व नवी मुंबईकर नागरिकांसाठी अभिमानाची गोष्ट असून या मानांकनाबद्दल महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी समाधान व्यक्त केले आहे.
मागील आर्थिक वर्षात कर वसूलीची चांगली कामगिरी करण्यात आल्याने नवी मुंबई महानगरपालिकेची आर्थिक स्थिती सक्षम राहिलेली आहे. या कालावधीत थकीत मालमत्ताकर धारकांना दिलासा देणारी ‘मालमत्ताकर अभय योजना’ प्रभावीपणे राबविण्यात आली. त्यालाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. मालमत्ताकर विभागाने आत्तापर्यंतचे सर्वोच्च २६ कोटीहून अधिक करवसूली केली.
इतरही विभागांनी त्यांचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले. विविध करांव्दारे प्राप्त होणा-या निधीमधूनच नागरी सेवासुविधांची पूर्तता करण्यात येत असल्याने नवी मुंबईकर नागरिकांना अधिक उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे शक्य झाले आहे. ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण’ तसेच माझी वसुंधरा अभियान यामध्येही नवी मुंबई महानगरपालिकेने उत्तम कामगिरीचे सातत्य राखले आहे.
महापालिका आयुक्तांमार्फत महानगरपालिकेच्या आर्थिक नियोजनाकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे. करवसूलीमध्ये चांगली कामगिरी आणि नागरी सुविधांच्या योग्य बाबींवरच खर्च असे सुयोग्य धोरण अवलंबिल्याने तसेच ई गव्हर्नन्सची प्रभावी अंमलबजावणी करीत ई ऑफिस कार्यप्रणाली राबविल्याने पालिकेच्या कामकाजात गतिमानतेसोबतच पारदर्शकता आलेली आहे.
लेखा विभागामार्फत ‘होस्ट टू होस्ट’ प्रणालीव्दारे देयके व रक्कमा अदायगी होत असून महानगरपालिकेचे कोणतेही पेमेंट पुरवठादाराच्या थेट बँक खात्यात जमा होत आहे. यामधून कामकाजात पारदर्शकता आली आहेच शिवाय कामकाजही पेपरलेस व गतीमान झाले आहे. कंत्राटदारांची अदायगी व अधिकारी, कर्मचारी यांचे पगारही वेळेवर होत आहेत. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेकडे महाराष्ट्र शासन, एम.एम.आर.डी.ए., एम.आय.डी.सी. यापैकी कोणाचेही कर्ज, व्याज अथवा कर थकीत नाही.
त्यामुळे या सा-यांचे फलित म्हणजे हे पत मानांकन असून यापुढील काळातही महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जमेच्या तुलनेत नागरिकांना उपयोगी अशा नागरी सुविधांवरील योग्य खर्च ही पध्दत कायम राखली जाणार आहे. त्यामुळे “इंडिया रेटींग अँड रिसर्च” या नामांकीत संस्थेमार्फत “इंडिया AA+ Stable” हे सातत्याने अकराव्या वर्षी लाभलेले पत मानांकन कायम राखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज आहे.
आर्थिक शिस्तीमुळेच सातत्याने यशप्राप्ती
नवी मुंबई महापालिकेत पालिकेला कर रूपातून मिळणारे उत्पन्न व होणारा खर्च याच्यावर नेहमीच आर्थिक शिस्तीचे नियंत्रण ठेवल्यामुळे नवी मुंबई महापालिकेला सातत्याने आर्थिक सक्षमतेचे मानांकन प्राप्त होत आहे. यात कर भरणाऱ्या नवी मुंबईकर नागरिकांचाही सर्वात मोठा वाटा आहे. या आर्थिक वर्षातही पालिकेकडे ३०जून पूर्वीच ३०० कोटी अँडव्हान्स मालमत्ता कर रक्कम नागरिकांनी पालिकेकडे जमा केला आहे. – डॉ. कैलास शिंदे,आयुक्त, नवी मुंबई महापालिका.