नवी मुंबई : नवी मुंबईत मनसेतर्फे आज (शुक्रवार, ७ नोव्हेंबर) ‘खोट्या मतदारांचे प्रदर्शन’ भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन पक्षाचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते झाले. प्रदर्शन पाहिल्यानंतर अमित ठाकरे यांनी मतदार यादीतील घोळाबद्दल तीव्र संताप व्यक्त करत, “हे केवळ प्रदर्शन नाही तर प्रत्येक मतदाराच्या गालावर चपराक आहे,” अशी प्रतिक्रिया दिली.
नवी मुंबईत मतदार याद्यांमधील घोळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उघड केल्यानंतर, हे घोळ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत म्हणून वाशी येथे ‘खोट्या मतदारांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. यावेळी अमित ठाकरे यांनी या प्रदर्शनाचे उद्घाटन करून मतदार यांद्यांमधील घोळाचा आढावा घेतला. मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी अमित ठाकरेंना या घोळाबद्दल संपूर्ण माहिती दिली.
या प्रदर्शनात मनसेने उघड केलेल्या घोळांपैकी पालिका आयुक्तांच्या घराचा पत्ता असलेल्या मतदारांची नवे, शौचालयाच्या पत्त्यावरील मतदाराचे नाव, मृत व्यक्तींची मतदार यादीतील नावे सर्वसामान्यांपुढे मांडण्यात आले. त्याशिवाय गुजराती भाषेत लिहिलेली नावे, घर क्रमांक शून्य असलेली नावे मांडण्यात आली. इतकेच नव्हे तर या प्रदर्शनात एका मतदाराचा पत्ता चक्क मुंबई महापालिका लिहिल्याचे आढळले असून, नवी मुंबईतील एका धार्मिक स्थळावरही मतदारांची नोंद झाल्याचे आढळून आले.
या सर्व प्रकाराचे निरीक्षण केल्यानंतर अमित ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त करत,” हे पाहताना वाईट वाटतंय आणि काय बोलायचं हेच समजत नाही. निवडणूक आयोगाला निवडणूक घ्यायची, एवढी घाई का झाली आहे? हेच समजत नाही. हा गोंधळ तातडीने थांबवला पाहिजे. हे केवळ प्रदर्शन नाही तर प्रत्येक खऱ्या मतदारांच्या गालावर चपराक आहे.” अशी तीव्र प्रतिक्रिया अमित ठाकरेंनी दिली आहे.
पुढे बोलताना त्यांनी, “बोगस मतांच्या आधारे सत्ताधारी जिंकून येत आहेत. तब्बल ९६ लाख दुबार मतदार यादीत घुसवले गेले आहेत. मृत व्यक्तींची नावे अजूनही मतदार यादीत आहेत. राज्य आणि केंद्र निवडणूक आयोग एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. म्हणून निवडणूक घाईघाईत लावण्याची काहीही गरज नाही. अजून सहा महिने घेऊन मतदार यादी दुरुस्त करा.” अशी मागणीही अमित ठाकरेंकडून यावेळी करण्यात आली.
मनसेने मतदार यादीतील घोळ उघड करूनही ज्या पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित करण्यात आल्या त्यानुसार, निवडणूक आयोग सुधारणार नसल्याचेही अमित ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे येत्या काळात लवकरात लवकर महापालिका निवडणुका लागण्याचा अंदाज अमित ठाकरेंनी व्यक्त केला असून, प्रत्येक खऱ्या मतदाराने येत्या निवडणुकीत घरा बाहेर पडून मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच दुबार मतदान करणाऱ्यांचे काय करायचे ते राजसाहेब ठाकरेंनी आम्हाला सांगितले आहे. त्याची चिंता मतदारांनी करू नये. असे म्हणत दुबार मतदान करणाऱ्यांना मनसे स्टाईल उत्तर दिलं जाईल असा इशाराही अमित ठाकरेंनी यावेळी दिला आहे.
या प्रदर्शनाला सर्वसामान्य नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. मतदार यादीतील घोळाबद्दल प्रत्यक्ष पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. यावेळी प्रदर्शन पाहायला आलेल्या ८० वर्षाच्या मोहन नागवेकर यांनी लोकसत्ताला दिलेल्या प्रतिक्रियेनुसार,” मी गेली ६० वर्षं मतदान करतो आहे. परंतु, यादीतील घोळ पाहिल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसला असून, मी केलेले मतदान माझ्याच उमेदवाराला मिळाले की नाही याबद्दल आता मनात शंका निर्माण झाली आहे.” असे त्यांनी सांगितले.
मतदार यादीतील घोळ आणि निवडणूक आयोगाचा कारभार याबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप दिसून येतो आहे. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुका जाहीर करण्यापूर्वी निवडणूक आयोग दुबार, मृत आणि बोगस मतदारांची नावे यादीतून वगळणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
