नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून कामे काढण्यात आली. मोठ्या प्रमाणात आपली कामे पदरात पाडून घेण्यासाठीचा पालिका मुख्यालयातील आजी-माजी लोकप्रतिनिधींचा गराडा चर्चेचा विषय ठरला होता. आचारसंहिता लागण्यापूर्वीची पालिकेतील गर्दी सर्वांचे लक्ष वेधून घेणारी होती. शासकीय नियमानुसार महापालिका, सिडको, रस्ते विकास महामंडळ यांसह विविध शासकीय आस्थापनांकडून कामे करताना त्या ठिकाणच्या कामांची इत्थंभूत माहिती फलकावर लावणे अत्यावश्यक आहे. मात्र पालिका प्रशासन व ठेकेदार यांच्या संगनमतानेच कामाच्या ठिकाणच्या फलकावर खर्चाच्या आकडेवारीची लपवाछपवी सुरू आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

यंदाचे हे आर्थिक वर्ष निवडणुकांचे वर्ष म्हणून गाजणार आहे. त्याचदृष्टीने एकीकडे फोडाफोडीचे व पक्षबदलांचे वारे सातत्याने बदलत असून राजकीय पक्षांनीही निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राजकीय तसेच आर्थिक मोर्चेबांधणी सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा >>> उरणच्या खाडीपूल दुरुस्तीचे काम पूर्ण; ‘हाइट गेट’ हटवण्याची प्रतीक्षा; चार गावांतील हजारो नागरिकांना दिलासा

महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू असल्याने शहरातील तसेच विविध प्रभागांतील विकासकामे करताना कामांचे प्रस्ताव बनवणे तसेच लेखा विभागातून आर्थिक तरतूदीची परवानगी तसेच त्यानंतर पालिका आयुक्तांची प्रस्तावांना मंजुरी घेऊन कामाचे कार्यादेश तसेच काही आगामी काळात होणाऱ्या कामांना मंजुरी घेऊन आता प्रत्यक्ष कामे करताना मात्र नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

विविध शासकीय आस्थापनांकडून काम मंजूर झाल्यानंतर त्या कामाचा कार्यादेश दिल्यानंतर काम सुरु होण्याआधीच कामाची टक्केवारी पदरात पाडून घेण्याचा शिरस्ता निवडणुकीच्या धामधुमीत सुरू असताना ठेकेदारांनी कामे पदरात पाडून घेतली आहेत. परंतू आता प्रत्यक्ष काम करताना निविदा प्रक्रियेच्या नियमानुसार कोणतेही कामाचा कार्यादेश प्राप्त झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराने त्या कामाच्या ठिकाणी संपूर्ण प्रकल्पाची माहिती, कार्यादेश तसेच काम सुरू करण्याचा दिनांक, काम पूर्ण करण्याचा दिनांक तसेच ठेकेदाराचे नाव तसेच या प्रकल्पासाठी येणाऱ्या खर्चाची कार्यादेशानुरूप असलेली रक्कम टाकणे बंधनकारक आहे. परंतू अनेक ठिकाणी कामाचे फलक दिसत असताना ठेकेदार मात्र कामाची रक्कम यांचा उल्लेख करण्याचे टाळत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा >>> पनवेल : ‘त्या’ विकृत सासू विरोधात सूनेने केली अखेर फौजदारी तक्रार

रकमेशिवाय फलक लावण्याचे कारण काय ?

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरु असताना कामाच्या फलकांवर असणारी कामांसाठीची रक्कमच न टाकण्याचे कारण काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कार्यादेश मिळण्याआधीच काही ठेकेदार कामाच्या ठिकाणी निविदा फलक लावतात की काय असा प्रश्न आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठेकेदार कामाबाबत तसेच खर्चाच्या रकमेबाबत संपूर्ण माहिती कामाच्या ठिकाणी लावत नसतील तर याबाबत माहिती घेऊन तात्काळ ठेकेदारांवर कारवाई करण्यात येईल. कामाच्या ठिकाणी कामाच्या संपूर्ण माहितीसह खर्चाची रक्कमही लिहणे अनिवार्य आहे. – संजय देसाई, शहर अभियंता