शहर सुरक्षेसाठी महत्वाच्या सीसीटीव्ही मध्यवर्ती नियंत्रण कक्षाचीही केली पाहणी

नवी मुंबई – नवी मुंबई शहर सुरक्षीततेला बळकटी देणा-या सीसीटीव्ही प्रकल्पाच्या कामास वेगाने सुरुवात झालेली असून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी शहर अभियंता संजय देसाई आणि अतिरिक्त शहर अभियंता  शिरीष आरदवाड यांच्या समवेत सीसीटीव्ही प्रणाली मुख्य नियंत्रण कक्षाची प्रत्यक्ष पाहणी करत हा प्रकल्प अधिक परिपूर्ण व सर्वसमावेशक होण्याच्या दृष्टीने मौल्यवान सूचना केल्या. शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा एप्रिल अखेरीस सुरु करणारच असल्याची माहिती लोकसत्ताला दिली.त्यामुळे आता संपूर्ण शहर सीसीटीव्हीच्या नजरेत येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> जेएनपीटी रुग्णालयाचे खाजगीकरण? कामगार आणि प्रकल्पग्रस्तांचाही विरोध

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने १५०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे संपूर्ण शहरभर  बसविण्यात येत असून त्याचा मध्यवर्ती नियंत्रण कक्ष महापालिका मुख्यालयात पहिल्या मजल्यावर तयार करण्यात आला आहे. सध्या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ७०२ विविध प्रकारचे हायडेफिनेशन कॅमेरे बसविण्यात आले असून त्यातील ६३ कॅमेरे मुख्य नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आलेले आहेत.पालिका आयुक्तांनी मुख्य नियंत्रण कक्षाच्या भेटीमध्ये कॅमेरा लावलेल्या ठिकाणावरील सीसीटीव्ही छायाचित्रीकरण बारकाईने पाहिले. हे सर्व कॅमेरे हायडेफिनेशन असून आयुक्तांनी नियंत्रण कक्षाशी जोडलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यांव्दारे झूम इन व झूम आऊट करून शहरात काही भागात सुरु असलेल्या हालचालींची पाहणीही केली.

सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी ५९२ ठिकाणी खाबांकरिता कॉंक्रिटचा पाया तयार करण्यात आला असून ५३५ खांब उभारण्यात आलेले आहेत. आयुक्तांनी सर्व माहिती सविस्तर जाणून घेतली व कोणत्या भागातील कॅमेरे कार्यान्वित झालेले आहेत तसेच कोणत्या भागातील खांब बसवून झालेले आहेत याची विस्तृत माहिती घेतली.या प्रकल्पांतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ५४० स्थानांवर विविध प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत असून २३० स्थानांवर कॅमेरे बसवून झालेले आहेत. त्यामध्ये शहरातील मुख्य चौक, बस डेपो, मार्केट्स, उद्याने, मैदाने, नाके, वर्दळीची ठिकाणे, महापालिका कार्यालये, पामबीच, ठाणे बेलापूर रोड, सायन पनवेल असे जास्त रहदारीचे रस्ते येथे हाय डेफिनेश कॅमेरे बसविण्यात येत आहेत.या कॅमे-यांमध्ये ९५४ स्थिर कॅमे-यांचा तसेच ३६० अंशामध्ये गोलाकार चित्रण टिपणा-या १६५ पीटीझे़ड कॅमे-यांचा समावेश आहे. याशिवाय नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राला लाभलेला विस्तारित सागरी किनारा लक्षात घेऊन सागरी सुरक्षेच्या दृष्टीने ९ थर्मल कॅमेरे बसविण्यात येत आहेत.

हेही वाचा >>> हेल्मेटचा बेल्ट न बांधणे पडले महागात, अपघातात मृत्यू

त्याचप्रमाणे पोलीस विभागाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असे ९६ इव्हिडन्स कॅमेरे हे २४ मुख्य ट्रॅफिक जंक्शनवर बसविण्यात येत असून २८८ एएनपीआर म्हणजेच ॲटोमॅटीक नंबर प्लेट रेक्गनेशन कॅमेरे देखील बसविण्यात येत आहेत. या एएनपीआर कॅमे-याव्दारे स्वयंचलीत पध्दतीने वाहनांवरील नंबर प्लेट वाचन करता येणार आहे. ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर सिग्नल तोडणा-या तसेच वाहतुकीच्या इतर नियमांचा भंग करणा-या वाहनचालकांच्या घरी थेट दंडात्मक चलन फोटोसह पाठविले जाणार आहे.

तसेच २४ ट्रॅफिक जंक्शनवर पब्लिक अनाऊंसमेंट सिस्टीम बसविण्यात येत असून याव्दारे आपत्कालीन व्यवस्थेच्या दृष्टीने अत्यावश्यक क्षणी नागरिकांकरिता सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातून महत्वाच्या सूचना देणे शक्य होणार आहे.या सीसीटीव्ही प्रणालीच्या मुख्य केंद्रीय नियंत्रण कक्ष पालिका मुख्यालय येथे सुरु करण्यात आला असून तेथील कार्यप्रणालीची विस्तृत माहिती आयुक्त  नार्वेकर यांनी त्याठिकाणी भेट देत जाणून घेतली आहे. हा नियंत्रण कक्ष नवी मुंबई पोलीस आयुक्तालय येथील विशेष कक्षाशी जोडला जाणार आहे. अशाच प्रकारचा निरीक्षण कक्ष वाहतुक पोलीस उपायुक्त कार्यालय तसेच पोलीस उपआयुक्त परिमंडळ १ यांचे कार्यालयातही असणार आहे.या सर्व सीसीटिव्ही कॅमे-यांमधील चित्रीकरणाची नियंत्रण कक्षातील संग्रहण क्षमता ३० दिवसांची असणार असून या प्रणालीमध्ये महत्वाच्या प्रसंग, घटना यांचे सीसीटिव्ही चित्रीकरण स्वतंत्रपणे संग्रहण करून ठेवण्याची सुविधा उपलब्ध आहे.

या सीसीटीव्ही प्रणालीव्दारे नवी मुंबईच्या शहर सुरक्षिततेचे सक्षमीकरण होणार असून याबाबत पोलीस विभागाशी समन्वय साधून ही प्रणाली अधिक प्रभावीपणे कार्यरत राहण्याच्या दृष्टीने पोलीसांसोबत संयुक्त बैठक आयोजित करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित विभागास दिल्या आहेत.

चौकट – नवी मुंबई शहरासाठी व या शहरातील प्रत्येक नागरिकांच्या सुरक्षेसाठी पालिकेकडून सीसीटीव्ही यंत्रणा सुरू करण्यात येणार आहे. पालिका मुख्यालयात उभारण्यात आलेल्या मुख्य नियंत्रण कक्षाला भेट दिली असून एप्रिल अखेरपर्यंत ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे त्यामुळे नागरिकांच्या व शहराच्या सुरक्षिततेत वाढ होणार आहे.राजेश नार्वेकर, आयुक्त नवी मुंबई महापालिका

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai municipal commissioner rajesh narvekar inspected the cctv central control room zws
First published on: 19-03-2023 at 17:16 IST