नवी मुंबई : संपूर्ण राज्यभरात उन्हाचा चटका सातत्याने वाढत असून नवी मुंबईतही दिवसेंदिवस वाढत्या तापमानामुळे नागरीक हैराण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सद्यास्थितीत मार्च महिन्यापासून राज्यातील अनेक भागांत तापमान वाढताना दिसत आहे. ही उष्णतेची लाट किंवा हीट वेव्ह म्हणजे एक मूक आपत्ती आहे. सर्वसाधारणपणे एखाद्या प्रदेशात नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमान ३ अंश सेल्सिअसने सलग तीन दिवस जास्त असेल तर त्याला ‘उष्णतेची लाट’ असे संबोधले जाते. अथवा एखाद्या भागात सलग दोन दिवसांसाठी ४५ अंश सेल्शिअसपेक्षा तापमान जास्त असेल तर त्या भागात उष्णतेची लाट आली आहे, असे म्हटले जाते. नवी मुंबईत मागील काही दिवसापासून हवेतील आर्द्रता ५५ अंश सेल्सिअस पर्यंत पोहचली आहे.

साधारणपणे मार्च ते जून या मान्सून पूर्वकाळात या उष्णतेच्या लाटा येताना दिसतात. वातावरणाचे तापमान ३७ डिग्री सेल्सियस असते तोपर्यंत मानवाला त्याचा तितकासा त्रास होत नाही. मात्र त्यानंतर मात्र मानवी शरीर वातावरणातील उष्मा शोषून घेऊ लागते आणि त्याचे विपरित परिणाम मानवाच्या शरीरावर होऊ लागतात. तापमान आणि आर्द्रता यांचा मिळून होणारा परिणाम अधिक जास्त असतो. त्यामुळे अति जोखमीच्या लोकांची उष्णतेच्या लाटे संदर्भात विशेष काळजी घेतली पाहिजे. यामध्ये – उन्हात बाहेर कष्टाची कामे करणारे लोक, वृध्द नागरिक आणि लहान मुले, स्थूल नागरिक, अयोग्य कपडे घालेले लोक, पुरेशी झोप न झालेले लोक, गरोदर महिला, अनियंत्रित मधुमेह, हृदयरोग असलेले लोक, अपस्मार रुग्ण, दारुचे व्यसन असलेले लोक, काही विशिष्ट औषधे घेत असलेले लोक तसेच निराश्रित, घरदार नसलेले गरीब लोक यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे.

हेही वाचा : उरणकरांवर पाणीटंचाईचे संकट; दोन्ही धरणांनी तळ गाठला

उष्णतेमुळे होणारा शारीरिक त्रास हा मुख्यत्वे किरकोळ स्वरुपाचा त्रास किंवा गंभीर स्वरुपाचा त्रास या प्रकारचा असतो. किरकोळ त्रासात उष्णतेमुळे शरीरावर रॅश उमटणे, हाता-पायाला गोळे येणे, चक्कर येणे तर गंभीर प्रकारात उष्माघाताचा समावेश होतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उष्मा जाणवल्यास प्रथमोपचार

साधारणपणे उष्णतेमुळे त्रास झाल्यास त्या अनुषंगाने प्रथमोपचार करावेत. साधा साबण वापरून आंघोळ करावी, घामास अडथळा करणारा कातडीवरील तेलकटपणा दूर करावा, कातडीवर फोड असतील तर वैद्याकिय सल्ला घ्यावा. उष्णतेमुळे प्रचंड थकवा , खूप घाम, थकवा, कातडी थंडगार, नाडीचे ठोके मंद, डोकेदुखी, चक्कर, उलटी ही लक्षणे आढळत असून या रूग्णाला थंड जागी शक्यतो एसी मध्ये झोपवावे, अंगावरील कपडे सैल करावेत, ओल्या व थंड फडक्याने अंग पुसून घ्यावे, थोडे थोडे पाणी पाजत रहावे तसेच उलटी होत असेल तर पाणी देऊ नये व दवाखान्यात हलवावे. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी पुरेसे पाणी प्यावे. प्रवासात पाणी सोबत ठेवावे. हलक्या वजनाचे, फिकट रंगाचे, सैलसर कपडे वापरावेत