नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिका सरळसेवा भरती -२०२५ बाबत ऑनलाईन परीक्षा १६ जुलैपासून ते १९ जुलैपर्यंत घेण्यात येत असून महाराष्ट्रातील विविध ११ जिल्ह्यात २८ केंद्रावर या परीक्षा घेण्यात येत असून १६ जुलै रोजी दुपारी १ ते ३ वा. च्या परीक्षा सत्रात कोल्हापूर जिल्हयातील परीक्षा केंद्रावर उपस्थित पर्यवेक्षकामार्फत विद्यार्थ्यास परीक्षेच्या दरम्यान उत्तराचा पुरवठा केला गेल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत तातडीने चौकशी करण्यात आली असून पर्यवेक्षकामार्फत एका उमेदवारास २ ते ३ प्रश्नांची उत्तरे उमेदवाराने न विचारता पर्यवेक्षक सांगत असल्याचे सिसिटिव्ही चित्रीकरण पाहणी केली असता निदर्शनास आलेले आहे.
त्यामुळे सदर पर्यवेक्षकास त्वरीत पर्यवेक्षक पदावरुन हटविण्यात आले असून कोल्हापूर जिल्हयात नियुक्त नवी मुंबई महानगरपालिकेचे परीक्षा समन्वय अधिकारी यांचेमार्फत परीक्षा घेणा-या टिसीएस संस्थेस सदर पर्यवेक्षकावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार परीक्षा घेणा-या संस्थेमार्फत संबधित पर्यवेक्षकावर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. याबाबत परीक्षा पर्यवेक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे
नवी मुंबई महानगरपालिकेची परीक्षा प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पध्दतीने होण्याकरिता अगदी सुरुवातीपासून संपूर्ण दक्षता घेण्यात आलेली असून परीक्षापूर्व व परीक्षा कालावधीतही सर्व बाबींवर काटेकोर लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यामुळे परीक्षेस प्रविष्ट झालेल्या उमेदवारांनी परीक्षा प्रक्रियेबाबत कोणत्याही प्रकारची संदिग्धता बाळगू नये व अफवांना बळी पडू नये असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
नवी मुंंबई महापालिकेच्या ६६८ जागांसाठीच्या पदभरतीला चांगला प्रतिसाद लाभला असून कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसून पारदर्शक पदध्तीने होणाऱ्या भरतीबाबत चुकीचा प्रकार निदर्शनास आल्याने संबंधित प्रकरणी पालिकेने टीसीएस या एजन्सी कंपनीला तात्काळ कारवाईचे निर्देश दिले असून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.