नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) तुर्भे सेक्टर १८ मधील कांदा-बटाटा मार्केटमधील आठ प्रमुख इमारतींना नवी मुंबई महापालिकेने ‘अतिधोकादायक’ घोषित करत त्यांचा वापर तातडीने थांबवण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या सर्वेक्षणात ए ते एचपर्यंतच्या इमारतींमध्ये गंभीर संरचनात्मक दोष आढळून आले असून, त्या इमारती तत्काळ रिकाम्या करून पाडाव्या लागतील, यामुळे तातडीने त्या रिकाम्या कराव्यात, असा इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर एपीएमसीनेही २२ जून रोजी व्यापारी संघटनांना नोटीस बजावून केवळ २४ तासांच्या आत गाळे रिकामे करण्याचा आदेश दिला आहे. इमारतींच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून व्यवसाय सुरू ठेवला, तर त्यात होणाऱ्या संभाव्य जीवित किंवा वित्तहानीस संबंधित व्यापारी स्वतः जबाबदार राहतील, असा इशारा नोटिशीतून देण्यात आला आहे. महापालिकेने कारवाईचा भाग म्हणून शुक्रवारी संध्याकाळपासून बाजार परिसराचा पाणीपुरवठाही खंडित केला आहे.

पुनर्विकासाची प्रक्रिया राबवण्याची मागणी

गेल्यावर्षी पालिकेकडून देण्यात आलेल्या अतिधोकादायकच्या नोटिशीनंतर व्यापाऱ्यांनी बाजार समितीच्या साहाय्याने इमारतींची तात्पुरती डागडुजी केली. लोखंडी खांब लावून बाजाराला आधार देण्यात आला आहे. बाजराच्या पुनर्विकासालाही व्यापाऱ्यांनी संमती दिली असून, पुनर्विकास प्रक्रियेतील याचिका सध्या न्यायप्रविष्ट आहे. या बाजाराच्या तात्काळ बंदीमुळे मुंबई, ठाणे तसेच उपनगरांतील पुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजार सुरू ठेवूनच पुनर्विकासाची प्रक्रिया राबवावी, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे

ग्राहक व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर

या इमारती १९७७ साली बांधण्यात आल्या असून, त्यांना चार दशकांहून अधिक काळ लोटला आहे. या काळात छत कोसळणे, भिंती उखडणे, पावसाळ्यात गळती यांसारख्या घटना वारंवार घडल्या आहेत. नुकतीच कांदा मार्केटमधील सभापतींच्या कार्यालयामागील भाग कोसळल्याची घटना ताजी आहे. त्यामुळे बाजार परिसरात दररोज काम करणाऱ्या व्यापारी, माथाडी कामगार, ग्राहक व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

गेल्यावर्षीच्या पालिकेच्या नोटिशीनंतर सर्व व्यापाऱ्यांनी मिळून इमारतींच्या पुनर्विकासाला संमती दर्शवली आहे, तसेच कांदा-बटाटा हे अत्यावश्यक असल्याने हा बाजार चालू ठेवण्याविना पर्याय नाही. आम्ही आणि बाजार समितीने मिळून केलेली डागडुजीही पुरेशी मजबूत आहे. कोर्टात सुरू असलेल्या खटल्यामुळे मर्यादा असल्या तरी लवकरात लवकर पुनर्विकास व्हावा, हीच आमची मागणी आहे. त्यामुळे खंडित केलेल्या पाणीपुरवठ्याबद्दलही आम्ही पालिकेला निवेदन दिले. – संजय पिंगळे, अध्यक्ष, आडत व्यापारी संघ, कांदा-बटाटा मार्केट