नवी मुंबई : युनेस्कोने जागतिक वारसास्थळांच्या यादीत छत्रपती शिवरायांचे बारा किल्ले समाविष्ट केले आहेत. छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यासाठी तसेच शिवरायांचा हा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी यंदा ‘दुर्गोत्सव’ हा अभिनव उपक्रम साजरा करण्यात येत आहे. किल्ले साकारताना या वारसास्थळांच्या कलाकृती नवी मुंबईकरांनाही पाहता याव्यात याकरिता आपल्याकडील उपलब्ध जागेत प्रतिकृती साकारून दुर्गोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

दीपावली आणि फराळ, रांगोळी याप्रमाणेच या उत्सवात मिळेल त्या जागेत लहानथोरांनी मिळून दुर्गांच्या प्रतिकृती बनविण्याची आपली सांस्कृतिक परंपरा आहे. या माध्यमातून इतिहासाला उजाळा मिळतोच, तसेच पुढच्या पिढीच्या मनात आपल्या वैभवशाली वारशाच्या अभिमानाची रुजवात होते. हा शिवछत्रपतींना मानवंदना देणारा दीपावली कालावधीत स्वयंस्फूर्तीने साजरा होणारा दुर्गोत्सवाचा उपक्रम अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून जगात कुठेही अशा स्वरूपाचा उपक्रम साजरा केला जात नाही. त्या अनुषंगाने नागरिकांनी आपल्या अंगणात, घरासमोरील जागेत, सोसायटीच्या आवारात, बागेमध्ये अथवा बाल्कनीत युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट केलेल्या स्थळांच्या प्रतिकृती साकारायच्या आहेत. यामध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, साल्हेरदुर्ग, खांदेरीचा दुर्ग, जिंजी, पन्हाळगड, शिवनेरी, विजयदुर्ग, लोहगड, पद्मदुर्ग अशा १२ दुर्गांच्या हुबेहूब प्रतिकृती उत्तम सजावटीसह आपल्या कुटुंबातील – परिवारातील सर्वांनी एकत्र येऊन बनवाव्यात.

या दुर्गोत्सवात सहभागी होण्याकरिता २५ ऑक्टोबरपर्यंत https://www.durgotsav.com/ या डिजिटल प्लॅटफॉर्मवर नाव व इतर तपशिलाचा फॉर्म भरून नोंदणी करावयाची आहे. त्यानंतर दुर्गोत्सवाच्या अनुषंगाने आपण बनविलेल्या १२ पैकी एका दुर्गासोबतचे सेल्फी छायाचित्र काढून ते https://www.durgotsav.com/ याच डिजिटल प्लॅटफॉर्मवर अपलोड करावयाचे आहे. या छायाचित्राची अमृत संस्थेमार्फत वैधता पडताळणी सिद्ध झाल्यानंतर भाग घेणाऱ्या प्रत्येकास मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे ‘अभिनंदन पत्र’ डिजिटल स्वरूपात प्रदान केले जाणार आहे. त्याचप्रमाणे ‘शिवचरित्रातून आज घ्यावयाचे धडे’ या विषयावरील उत्कृष्ट असे ऑडिओ आणि व्हिडीओ स्वरूपातील गोष्टीचे संकलनही नि:शुल्क उपलब्ध होणार आहे.

कोणत्याही उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या नवी मुंबईकर नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आपल्या मनात असलेला अभिमान अभिव्यक्त करण्यासाठी तसेच दीपावली सणात दुर्गांच्या प्रतिकृती बनविण्याची आपली सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी दुर्गोत्सव उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महापालिका