हवेतील सोडियम ऑक्साईडचे प्रमाण कमी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई : ठाणे-बेलापूर, तळोजा औद्योगिक वसाहतीमुळे ‘प्रदुषणकारी शहर’ म्हणून आक्षेप घेण्यात आलेल्या नवी मुंबई शहरातील प्रदुषणाची पातळी करोना संर्सगाच्या टाळेबंदीमुळे का होईना मागील आठवडाभरात कमालीची घटली आहे. सर्वसाधारपणे १०० युजी/ एम३ (मायक्रोग्रॅम पर क्युबिक मीटर) पेक्षा कमी असलेली हवेतील गुणवत्ता ही समाधानकारक मानली गेली आहे. ठाणे-बेलापूर आणि शीव-पनवेल महामार्गावरील वाहतूक व तळोजा एमआयडीसीतील रासायनिक कारखाने बंद असल्याने ही घट झाल्याने नवी मुंबईकरांना घरबसल्या स्वच्छ हवेचा आनंद घेता येत आहे.

मुंबईला पर्याय ठरू पाहणाऱ्या नवी मुंबईतील दक्षिण भागात मोठय़ा प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. त्याचप्रमाणे याच भागात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी उत्खननाचे काम जोरात सुरू आहे. तळोजा एमआयडीसीतील काही रासायनिक कारखाने पाण्याचे व हवेच मोठय़ा प्रमाणात प्रदुषण करीत असल्याच्या तक्रारी आहेत. याचवेळी ठाणे-बेलापूर औद्योगिक पटय़ातील काही कारखाने थंडीचा फायदा घेऊन नवी मुंबईतील हवेची गुणवत्ता बिघडविण्यात हातभार लावत असल्याचे आढळून आले आहे. मुंबईच्या देवणार व कांजूरमार्ग येथील कचराभूमीत अधूनमधून लागणाऱ्या आगींचाही त्रास नवी मुंबईकरांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे चारही बाजूने प्रदुषण निर्माण करणारे घटक असल्याने नवी मुंबईतील प्रदुषणाची पातळी नेहमीच जास्त आणि चिंताजनक राहिली आहे. केंद्र सरकारने मागील वर्षी केलेल्या राहणीयोग्य शहरांच्या सर्वेक्षणात नवी मुंबई केवळ प्रदुषणकारी शहरामुळे दुसऱ्या क्रमांकावर होते.

प्रदुषणाची ही मात्रा कमी वनसंपदा असल्याने मोठय़ा प्रमाणात जाणवत आहे. संपूर्ण नवी मुंबई पालिका क्षेत्रात केवळ आठ लाख झाडे आहेत. त्यात पावसाळ्यात मुळासकट कोसळणाऱ्या झाडांची संख्या जास्त आहे. सिडको व खासगी विकासकांना केलेल्या बांधकामामुळे या शहराची ओळख सिमेंटचे जंगल म्हणून झाली आहे. संचारबंदीने नवी मुंबईत आहे. त्यामुळे प्रदुषण निर्माण करणाऱ्या वाहनांचा ठाणे बेलापूर व शीव- पनवेल महामार्गावर शुकशुकाट आहे.

डोंगरामुळे हवेची कोंडी

नवी मुंबई, पनवेल आणि उरण या तीन शहरांनी तयार होणाऱ्या महामुंबई शहराची रचना ही सह्य़ाद्रीच्या पर्वतरांगा आणि खाडीकिनारा यामधील भूभागावर झालेली आहे. त्यामुळे इतर शहरापेक्षा या शहरातील हवा खेळती राहण्यास डोंगरामुळे अडचण येत असल्याचे पर्यावरण तज्ञांचे मत आहे. त्यामुळे हिवाळ्यात नवी मुंबईत मोठय़ा प्रमाणात प्रदुषणाचे धुरके दिसत असते. प्रदुषणाची पातळी कमी न होण्यामागे हे एक प्रमुख कारण असून टाळेबंदीच्या या काळात नवी मुंबईकर किमान प्रदुषणमुक्त नवी मुंबईचा अनुभव घेत आहेत.

महामुंबई क्षेत्रातील प्रदुषणाची पातळी साहजिकच कमी झाली आहे. प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या कर्मचाऱ्यांनाही घरातून बाहेर पडता येत नसल्याने ही सर्व माहिती ऑनलाईन पुरवली जात आहे. वाहने व औद्योगिक वसाहतीत टाळेबंदी असल्याने हवेतील सोडीयम ऑक्साईडचे प्रमाणही कमी झाले आहे.

-डी. बी. पाटील, प्रादेशिक अधिकारी, प्रदुषण नियंत्रण मंडळ

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai pollution levels drop sharply akp
First published on: 01-04-2020 at 03:27 IST