नवी मुंबई : नेरुळ येथील सुसज्ज इमारतीत नवी मुंबईतील उपप्रादेशिक कार्यालयाचा कारभार सुरू करण्यात आला आहे. मागील आठवड्यात गुरुवारी कार्यालयाचे सामान हलवण्यात आले, तर शु्क्रवारी कामकाजाला सुरुवात करण्यात आली. परंतु सोमवारपासून खऱ्या अर्थाने या कार्यालयाच्या कामाला वेगाने सुरुवात झाली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी नव्या कार्यालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नवी मुंबईचे उपप्रादेशिक कार्यालय वाशी येथे भाड्याने घेतलेल्या जागेत २००४ पासून सुरू होते. कमी जागेत त्यात तात्पुरती विभागणी करून अनेक वर्षे दाटीवाटीने जुन्या कार्यालयात कारभार सुरू होता.

नव्या कार्यालयासाठी इमारत बांधून पूर्ण असताना निव्वळ उद्घाटनासाठी या इमारतीत कारभार सुरू होत नसल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे उपप्रादेशिक कार्यालय नेरुळ येथील नव्या इमारतीत हस्तांतरण होण्यासाठी तारीख पे तारीख सुरू होती. त्यातच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनाचा प्रयत्न होता; परंतु त्यांच्या व्यग्र कार्यक्रमामुळे वेळ मिळत नसल्याने नागरिकांच्याच सोयीसाठी उभारलेल्या इमारतीत उद्घाटनाविना जोमाने कारभार सुरू करण्यात आला आहे.

हेही वाचा : आंदोलनातील हुतात्म्यांचा भूमिपुत्रांनाच विसर

नेरुळ परिसरात वंडर्स पार्कच्या समोर रहिवासी क्षेत्रात सुरू करण्यात आलेल्या आरटीओच्या वाहन तपासणी जागेला सुरुवातीला स्थानिक नागरिकांनी विरोध केला होता. त्यामुळे २७ ऑगस्ट २०१९ रोजी तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत नव्या इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला होता. नेरुळ, सेक्टर १३ येथे नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या इमारतीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले आहे. इमारतीत क्यूआर कोड लावला असून तो स्कॅन केल्यास कोणकोणत्या ऑनलाइन सुविधा आहेत याची माहिती होणार आहे. हिरकणी कक्षाबरोबरच रस्ता सुरक्षा संवाद कक्ष व्यवस्था असल्याची माहिती साहाय्यक उपप्रादेशिक अधिकारी सुरेंद्र निकम यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

हेही वाचा : खारघरमध्ये दिसणारा ‘तो’ प्राणी कोणता? वन विभाग कर्मचाऱ्यांचे पथक तैनात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोयीसुविधा

नागरिकांच्या सोयीसाठी चार मजल्यांवर विविध विभाग असून नागरिकांना संदेश देण्यासाठी भित्तिचित्रे तसेच दूरचित्रवाणीद्वारे वाहतुकीविषयी जनजागृती केली जात आहे. तसेच सुसज्ज इमारतीत रस्ता सुरक्षा संवाद कक्ष, हिरकणी कक्ष तयार करण्यात आले आहेत. “वाशी येथील अपुऱ्या जागेत वाशी उपप्रादेशिक कार्यालयाचे कामकाज अनेक वर्षे दाटीवाटीत सुरू होते. तेथे छताच्या प्लास्टरचा काही भागांची पडझडही सुरू झाली होती. नेरुळ येथील नवी इमारत सज्ज असल्याने नव्या इमारतीचे औपचारिक उद्घाटन झाले नाही, पण सर्व कार्यालयीन कामकाज सुरू करण्यात आले आहे. नागरिकांनाही चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. नव्या इमारतीत अधिक वेगाने काम करणे व नागरिकांना चांगल्या सुविधा देणे शक्य होत आहे.” – हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक अधिकारी, नवी मुंबई</p>