उरणमधील भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढतच आहे. शासकीय निर्बीजीकरणाकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झालेली आहे. या वाढत्या कुत्र्यांच्या संख्येमुळे वाहने चालविणेही कठीण झाले आहे. कोट नाका, पेन्शनर्स पार्क परिसरात रात्रीच्या वेळी दुचाकी तसेच चारचाकी वाहनांचा पाठलाग करणाऱ्या कुत्र्यांच्या टोळीने तर दहशतच निर्माण केली आहे. तसेच जेएनपीटी कामगार वसाहतीतही या भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने रात्री उशिरा परतणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.
अनेक वर्षांपासून भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण न केल्याने अशा कुत्र्यांची संख्या वाढली आहे. शहरातील गल्लोगल्ली तसेच ग्रामीण भागात या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिक त्रस्त आहेत.
रात्रीच्या वेळी उरण शहरातील मोरा, कोट नाका, आनंदनगर, कामठा,पेन्शनर्स पार्क, बोरी आदी भागांत या कुत्र्यांच्या दहशतीमुळे अनेक अपघात घडले आहेत. कामावरून परतणाऱ्या रात्रपाळीच्या कामगारांनाही या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे प्रसाद पाटील या कामगाराने सांगितले. कुत्र्यांनी चावे घेतल्याच्या दरमहा सरासरी दीडशे ते दोनशे घटना उरणमध्ये घडत आहेत.