पामबीच विस्ताराचे काम पावसाळ्यानंतर

प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी नियंत्रण विभाग, वन, खारफुटी समिती, पर्यावरण आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या परवानगीची आवश्यकता आहे.

घणसोली ते ऐरोली मार्गासाठी वन विभागाची परवानगी मिळणार?

विकास महाडिक
नवी मुंबई : ठाणे-बेलापूर मार्गावर वाढलेल्या वाहतूक कोंडीला पर्याय ठरू पाहणारा घणसोली ते ऐरोली या गेली बारा वर्षे रखडलेल्या पामबीच विस्तार मार्गाचे काम प्रत्यक्षात येत्या तीन महिन्यात अर्थात पावसाळ्यानंतर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या महिन्याअखेर पर्यंत या प्रकल्पासाठी लागणारी महत्त्वाची वन विभागाची पहिल्या टप्यातील मंजुरीला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.

या प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी नियंत्रण विभाग, वन, खारफुटी समिती, पर्यावरण आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या परवानगीची आवश्यकता आहे. ३७० कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प केवळ कांदळवनाच्या जंगलामुळे रखडलेला आहे. त्यावर पालिका तोडगा काढून हा प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न करीत आहे. या प्रकल्पामुळे ऐरोली आणि घणसोली येथील बांधकाम व्यवसायाला चालना मिळणार आहे.

सिडकोने बेलापूर ते ऐरोली या पामबीच मार्गाची रचना केलेली आहे. यातील वाशी ते बेलापूर हा पामबीच मार्ग वेगळा तयार करण्यात आला आहे. मात्र वाशी ते कोपरखैरणे हा पामबीच मार्ग ऐन लोकवस्तीतून तयार करण्यात आला असल्याने त्याला पामबीच मार्गाचा मुलामा नाही. हाच मार्ग पुढे कोपरखैरणे ते ऐरोली या सहा किलोमीटर अंतरात खाडीकिनारी तयार करण्यात आला आहे. वाशी ते बेलापूर हा ११ किलोमीटर लांबीचा मूळ पामबीच मार्गही खाडीकिनारी आहे. पहिला पामबीच मार्ग तयार करताना खारफुटी तसेच सागरी नियंत्रण कायदे प्रभावी नव्हते. त्यामुळे हा मार्ग तयार करण्यास सिडकोला अडचणी आल्या नाहीत, मात्र घणसोली ते ऐरोली या तीन किलोमीटर अंतरात मोठय़ा प्रमाणात कांदळवन असून खारफुटी संवर्धन कायदा अमलात आलेला आहे. त्यामुळे या पामबीच विस्तार मार्गासाठी सिडकोला बारा वर्षे परवानगी न मिळाल्याने घणसोलीपर्यंत तयार झालेला हा मार्ग रखडलेला आहे. काही दिवसापूर्वी मुंब्रा बायपास बंद झाल्यानंतर बेलापूर मार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली होती. अडीच ते तीन लाख वाहने या मार्गावर धावत होती. ठाणे-बेलापूर मार्गावरील दैनंदिन वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालिका, एमएमआरडीए, एमआयडीसी प्रयत्न करीत आहे, मात्र या मार्गावरील वाहतूक कोंडी सकाळ संध्याकाळ होत असल्याचे दिसून येत आहे. शिळफाटा मार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ऐरोली ते कल्याण फाटय़ापर्यंत १२ किलोमीटर मार्गाचे काम सुरू आहे. त्यासाठी पारसिक डोंगरातून बोगदा खोदण्याचे काम सुरू आहे. या मार्गावरून येणारी काही वाहतूक संभाव्य विमानतळाकडे जाण्यासाठी हा पामबीच विस्तार मार्गाची लांबी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे हा मार्ग आता केवळ बेलापूर मार्गावरील वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून नव्हे तर विमानतळाकडे जाणारा एक महत्त्वाचा मार्ग म्हणून तयार केला जात आहे. त्यासाठी पालिकेने शिळफाटा मार्गासाठी सल्ला देणारी सल्लागार कंपनी कायम केली असून सागरी नियंत्रण विभाग, वन, पर्यावरण, खारफुटी समिती या सर्व विभागाकडून परवानगी मिळविण्याच्या कामांना वेग आला आहे.

महिनाअखेर परवानगी?

खासदार राजन विचारे यांनी या प्रकल्पासाठी आतापर्यंत अधिकाऱ्यासोबत दोन बैठकांचे आयोजन केले असून अडचणीच्या ठिकाणी सहकार्य करण्याची भूमिका ठेवली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे यंदा काम सुरू होणार असून वन विभागाच्या एका टप्प्याला या महिनाअखेर हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. खारफुटी संदर्भात असलेल्या या मंजुरीनंतर मुंबई उच्च न्यायालयाची या प्रकल्पाला परवानगी मिळणे सुलभ होणार आहे. त्यामुळे पावसाळ्यानंतर या प्रकल्पाचा शुभांरभ होण्यााची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Palm beach expansion work after the rains ghansoli to airoli road ssh

Next Story
उरणमध्ये एनएमएमटी बस पास वितरण सुविधा देण्याची मागणी