पनवेल : नवी मुंबईतील कळंबोली सर्कलवर दररोजची डोकेदुखी ठरलेली वाहतूक कोंडी सुटली आहे. पोलिसांच्या पुढाकाराने आणि प्रशासनाच्या तातडीच्या निर्णयामुळे ऐन गणेशोत्सवात वाहनचालकांना दिलासा मिळाला.
कळंबोली सर्कलजवळ तब्बल १६ सेवारस्ते आणि अनेक राष्ट्रीय महामार्ग एकमेकांना मिळतात. त्यामुळे येथे दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होते. ही समस्या सोडवण्यासाठी कळंबोली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय भोसले यांनी पदभार स्वीकारल्यावर नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्याशी या समस्येबाबत चर्चा करत सर्कलची रुंदी कमी करणे व वापर कमी असलेल्या दोन रस्त्यांचा एकमेकांमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला.
या बदलामुळे उरण येथील जेएनपीटी बंदराकडे जाणाऱ्या तसेच पनवेल–मुंब्रा महामार्गाकडे वळणाऱ्या वाहतुकीसाठी प्रत्येकी ३० मीटर रुंदीचे दोन मार्ग उपलब्ध झाले आहेत. तसेच शीव-पनवेल महामार्गावरून सर्कलपर्यंत जाणाऱ्या वाहनांना अजून एक रांग वाहन चालविण्यासाठी मिळाली आहे. परिणामी या सर्कलवरून हलकी तसेच अवजड वाहने सुलभपणे मार्गक्रमण करू लागली आहेत.
गणेशोत्सव काळात या सर्कलमधून वाहनांचा मोठा ओघ असतानाही या नव्या रस्तेरचनेमुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला. काही काळापूर्वी मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गाच्या विकासावेळीच कळंबोली सर्कलचा विस्तार करण्यात आला. मात्र, त्यानंतर वाढत्या वाहनसंख्येमुळे हा सर्कल वाहन कोंडीसाठी ओळखला गेला. सतत कोंडी होत असलेल्या या सर्कलच्या नवीन रचनेमुळे काही प्रमाणात वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.
खड्डे भरण्याची मागणी
कळंबोली सर्कलशेजारील शीव–पनवेल महामार्गावरील खड्डे अजूनही न बुजविल्याने वाहनचालक राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त करत आहेत. सर्कलवरील अडथळे दूर झाले असले तरी महामार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांना अजूनही त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक वाहनचालकांनी प्रशासनाने तातडीने खड्डे बुजवावेत, अशी मागणी केली आहे.
उन्नत मार्ग प्रकल्प
राज्य सरकारने कळंबोली सर्कल परिसरातील महामार्गांसाठी स्वतंत्र उन्नत मार्ग (फ्लायओव्हर) करण्यासाठी तब्बल ४५० कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेतला आहे. हे काम ठाकूर इंन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड (टीआयपीएल) या कंपनीकडे असून त्यांच्या उपकंपनीने पोलिसांच्या सूचनेनुसार गणेशोत्सवापूर्वी सर्कलचा विस्तार कमी करून दोन रस्ते जुळवल्याने वाहतूक कोंडीपासून वाहनचालकांना दिलासा मिळाला.