पनवेल – कामोठे वसाहतीमध्ये रविवारी सायंकाळच्या सुमारास सेक्टर ६ ए येथील सरोवर हॉटेलसमोर एका मोटारीने रस्त्यावरुन चालणा-या महिलेला उडवले. या महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर या मोटारीने त्याच रस्त्याकडेला उभे असणा-या दोन मोटारींना मागून धडक दिली. अपघातानंतर रहिवाशी जमा झाले. त्यानंतर मोटारचालकाने अजून भरधाव वेगाने तेथून फरार होण्यासाठी एमएनआर विद्यालयासमोरील अजून एका दुचाकीला ठोकले. या दरम्यान त्याला रहिवाशांनी पकडून चोप दिला.

काही क्षणात तेथे कामोठे पोलीस पोहचले. पोलिसांनी संबंधित चालकाला वैद्यकीय तपासणीसाठी पनवेल येथील नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. या दरम्यान जखमी महिलेवर कामोठे येथील महात्मा गांधी मिशन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या या महिलेची प्रकृती बरी असल्याची माहिती कामोठे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक यशवंत पाटील यांनी सांगीतले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संबंधित मोटारीच्या मालकाने करंजाडे येथील एका गॅरेजमध्ये मोटार दुरुस्तीसाठी दिल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर येत आहे. मोटारमालकाच्या न कळत गॅरेजमधील व्यक्तीने ही मोटार रस्त्यावर काढल्याचे पोलिसांच्या प्राथामिक तपास समोर येत आहे.