पनवेल – कळंबोली उपनगरात पाच दिवसांपूर्वी एका घरात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायामाध्ये पोलिसांनी कारवाई केली. या धाडसत्रात पत्नीला वेश्या व्यवसायात ढकलून त्यातून मिळणा-या रकमेवर उपजिविका चालविणा-या एका तरूण पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले.
हा सर्व गैरधंदा सेक्टर ५ येथील बैठ्या चाळीतील एका खोलीत सुरू होता. या धक्कादायक प्रकारात ज्या दलाल व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले तो काही वर्षांपूर्वी राजकीय पक्षाचा नवनिर्माणासाठी हिरहिरीने काम करणारा अशी त्याची ओळख होती. मात्र या तरूणाने आर्थिक चणचणीतून झटपट बाहेर येण्यासाठी उचलेल्या या घ्रुणास्पद प्रकारामुळे कळंबोली हादरून गेले.
नवी मुंबई पोलीस दलाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पोलिसांना संबंधित वेश्या व्यवसायाची माहिती मिळाल्यावर त्यांनी सापळा रचला. या सापळ्यामध्ये पोलिसांनी मुंबई येथील एका व्यक्तीला बनावट गि-हाईक बनवून महिला पुरविणा-या व्यक्तिला फोनवरून संपर्क साधण्यात आला. फोनवरून संपर्कानंतर एका महिलेसाठी १० हजार रुपये घेणार असल्याचे ठरविण्यात आले.
१३ सप्टेंबरला कळंबोली येथील ४६ वर्षीय व्यक्तीला फोन करून संपर्क साधल्यावर त्याला दोन हजार रूपये ॲडवान्स पाठविण्यात आले. सायंकाळी चार वाजण्याची वेळ ठरल्यानंतर बनावट गि-हाईक आणि पोलिसांचे पथक कळंबोली येथे पोहचले. सुरूवातीला साडेचार वाजण्याच्या सूमारास बनावट गि-हाईकाने फोनवरून दलालाला संपर्क साधल्यावर त्याने घरचा पत्ता पाठविला. काही वेळातच बनावट गि-हाईकाने पोलिसांना उर्वरीत आठ हजार रुपयांची रक्कम दलालाने स्विकारल्याचा मेसेज मोबाईलवर पाठवताच पोलीसही काही क्षणात तेथे पोहचले. या पथकामध्ये महिला पोलीस सुद्धा होत्या.
पोलिसांनी या व्यक्ती आणि त्याच घरातील दोन महिलांकडे चौकशी केल्यावर दलाल स्वताच्या पत्नीकडून हा गैरधंदा करण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचे पोलिसांना समजले. या प्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविल्यावर संबंधित दलाल व्यक्तीला ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात आली.
नवी मुंबईच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांच्या पथकाने नवी मुंबईत या वर्षी अशाप्रकरच्या १५ वेगवेगळे धाडी घालून बेकायदेशीर वेश्या व्यवसायाला प्रतिबंध केला आहे. कळंबोलीतील या घटनेची तक्रार पोलीस अधिकारी घोरपडे यांच्या विभागाकडे आल्यानंतर पोलिसांनी धाडीचे नियोजन केले. या घटनेमुळे घरात वेश्या व्यवसाय चालविणा-यांचे धाबे दणाणले आहेत.
पोलीस अधिकारी घोरपडे यांनी कळंबोली येथील प्रकरणातील ४६ वर्षीय दलाल व्यक्तीकडे चौकशी केल्यावर त्याने कुटूंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने गेल्या काही दिवसांपासून हा चुकीचा निर्णय घ्यावा लागल्याचे पोलिसांना सांगीतले. वेश्या व्यवसायासाठी दलाली करणे हा स्त्री व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा कलम १९५६ प्रमाणे ३,४,५ अन्वये गुन्हा आहे. तसेच या प्रकरणात सात वर्षांखाली शिक्षा होत असल्याने संबंधित प्रकरणी ४६ वर्षीय दलाल व्यक्तीला न्यायालयात उपस्थित राहण्याची प्रतिबंधक नोटीस बजावून सोडून देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगीतले.