पनवेल – पनवेलमधील रस्ते पादचारी आणि हलक्या वाहनांसाठी धोकादायक बनले आहेत. गेल्या सहा महिन्यात पनवेलमधील विविध रस्ते अपघातामध्ये ४० हून अधिकांचा बळी गेला आहे. तसेच रविवारपासून आतापर्यंत दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले आहेत. 

सोमवारी (ता.११) रात्री कामावरून घरी पायी चालत मुंब्रा पनवेल महामार्ग खिडुकपाडा गावासमोर ओलांडणा-या २७ वर्षीय तरुणाला रात्री १० वाजता अनोळखी वाहनाने उडवले. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला. कळंबोली येथे राहणारा मोहम्मद हसन रईस मन्सूरी असे या मृत तरुणाचे नाव आहे. मोहम्मद हा सूताराचे काम करत होता. सोमवारी रात्री तो काम संपवून घरी येत असताना ही घटना घडली. मोहम्मदच्या डोक्याला व पाठीला जबर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. अनोळखी वाहन त्यानंतर घटनास्थळावरून फरार झाले. याबाबत कळंबोली पोलीस त्या वाहनाचा शोध घेत आहेत.

तसेच दूसरी अपघाताची घटना गव्हाण फाटा येथील नवीन पुलावर रविवारी सकाळी घडली. नेरूळ येथे राहणारे ५३ वर्षीय व्यक्ती दुचाकीवरून घरी जात असताना त्यांना इरटीगा मोटारीने धडक देऊन जखमी करून चालक फरार झाला. याबाबत पनवेल शहर पोलीस संबंधित मोटारचालकाचा शोध घेत आहेत. तीसरी घटना रविवारी सकाळी पावणेबारा वाजता पळस्पे फाटा येथे मुंबई पूणे द्रुतगती महामार्गासमोर घडली.

मुंबईतून लोणावळाकडे जाण्यासाठी क्रुझर जीपमधून जात असताना चालकाचा अचानक ताबा सुटल्याने जीपचा अपघात झाला. यामध्ये २२ वर्षीय आस्फीया बानो मोहम्मद फरीद खान यांचा मृत्यू झाला. आस्फीया या समाजमाध्यमांवरील रिल्स मुळे प्रसिद्धीस आल्या होत्या. या अपघातामध्ये चालकासह अजून चौघे जखमी झाले. इतर तिघांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून चालकावर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष डीगे यांनी दिली.