पनवेल – शहराजवळील करंजाडे रेल्वे फाटकाजवळ शुक्रवारी रात्री सराफा व्यवसायिकावर मोठा दरोडा टाकण्यात आला. या प्रकरणी व्यवसायिकाने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
व्यापारी विराज शिरकांडे यांचा “आशापुरा गोल्ड बुलीयन” नावाचा सोन्याचा व्यवसाय असून शुक्रवारी ते आपल्या तीन सहकाऱ्यांसह मुंबई झवेरी बाजारात सोन्याची खरेदीसाठी गेले होते. त्यांनी तेथे १० लाख रुपये रोख व प्रत्येकी १०० ग्रॅम वजनाची दोन सोन्याची बिस्किटे (२०० ग्रॅम सोनं, किंमत २३.४० लाख रुपये) खरेदी केली. उशिरा रात्री ते आपल्या ब्रिझा मोटारीमधून पनवेलकडे परत येत असताना करंजाडे रेल्वे फाटकाजवळ चॉकलेटी रंगाची इर्टिगा मोटार आडवी करून त्यांची मोटार अडवण्यात आली.
त्या गाडीतून उतरलेले तीन ते चार व्यक्तींनी पोलीसांचा गणवेश घातला होता. त्यांनी शिरकांडे व त्यांच्या सहकाऱ्यांना का मोटारीमधून बाहेर काढून पोलीस काठ्यांनी मारहाण केली व दमदाटी करत त्यांच्या गाडीतून १० लाखांची रोकड, दोन सोन्याची बिस्किटे, मोबाईल फोन व इतर वस्तू हिसकावून घेतल्या. त्यानंतर पीडितांना काही अंतरावर जबरदस्तीने नेऊन रस्त्यावर सोडून आरोपी पसार झाले. या घटनेत सोने, रोकड, अॅपल आयफोनसह अन्य मोबाईल फोन, घड्याळ आणि बॅगा यांची चोरी झाली.
घटनेनंतर शिरकांडे व त्यांचे सहकारी पायी चालत येऊन स्थानिकांच्या मदतीने भागीदाराशी संपर्क साधला आणि शेवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीसांनी बनावट पोलिसांच्या वेशात लुटमार करणाऱ्या या टोळीविरुद्ध दरोडा, अपहरण, मारहाण आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल केले असून तपास सुरू आहे. बनावट पोलिसांच्या नावाखाली पनवेल परिसरात सर्रास होणाऱ्या गुन्ह्यांमुळे व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.