पनवेल – पनवेल तालुक्यामधील ग्रामीण भागातील चिपळे पुल तसेच कोंडिचीवाडी या आदिवासी वाडी कडे जाणा-या पुलाचे तसेच पनवेल पळस्पे मार्गावरील भव्य कार्यालय अशा विविध विकासकामांचे उदघाटन करण्यात आले. हा लोकार्पण सोहळा शनिवारी (ता.१९) राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांच्या हस्ते पार पडला. यावेळी आ. प्रशांत ठाकूर, माजी खा. रामशेठ ठाकूर आणि भाजपचे असंख्य पदाधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मंत्री भोसले यांनी तब्बल २५ कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या विकासकामांचे उदघाटन पनवेल येथे केले.
कोंडिचीवाडी येथील आदिवासीवर जाण्यासाठी पावसाळ्यात नदी ओलांडावी लागत होती. अन्यथा येथे जाण्यासाठी टावरवाडीमार्गे डोंगरचढून आदिवासी बांधवांना घर गाठावे लागत होते. या बांधवांनी निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिल्यानंतर रायगड जिल्ह्याचे तत्कालिन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे या विभागाचे मंत्रीपद असताना संबंधित पुल बांधण्याच्या कामाला मंजूरी देण्यात आली.
सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे गाढी नदीवर ७ कोटी रुपये खर्च करुन ६० मीटर लांबीचा आणि साडेसहा मीटर रुंदीचा पुल बांधला. तसेच ४८ वर्षे जुना पुल चिपळे येथे बांधण्यात आला होता. नेरे व परिसरात वाढलेल्या नागरीकरणामुळे हा पुल अरुंद होता. त्यावरून मार्गस्थ होताना वाहतूकीचा कोंडी सामना करावा लागत असल्याने आ. प्रशांत ठाकूर यांच्या मागणीनंतर तत्कालिन मंत्री चव्हाण यांनी पनवेल नेरे मार्गावर चिपळे पुलावर साडेनऊ कोटी रुपये खर्च करुन १२ मीटर रुंदीचा पुल बांधला.
प्रशस्त पुल झाल्याने येथील भविष्यातील वाहतूक कोंडीची समस्या दूर होणार आहे. तसेच पनवेल पळस्पे मार्गावरील भिंगारी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय नव्याने बांधण्यात आले आहे. यासाठी १० कोटी रुपयांचा खर्च विभागाने केला आहे.