नवी मुंबई: दोन शाळकरी मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा मानसिक तणाव त्यातून आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल या एकाच दिवशी दोन घटना घडल्या आहेत. तर गणित सोडवले नाही म्हणून शिक्षिकेने विद्यार्थ्याला केलेल्या जबर मारहाणीमुळे तिच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण किती येत आहे हेच अधोरेखित होत असल्याचे दिसून येते. 

नवी मुंबईतील करावे गावातील तलावात एका पंधरा वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी समोर आली. दर्शिल पाटील असे त्या विद्यार्थांचे नाव आहे. दर्शिल हा दहावीत शिकत होता. रविवारी मध्यरात्री तो गुपचूप घरातून बाहेर पडला आणि करावे गावातील तलावात उडी मारून त्याने आपले जीवन संपवले. त्यापूर्वी त्याने आपण कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही म्हणून आत्महत्या करीत असल्याचा संदेश बहिणीला मोबाईल वर पाठवला होता.

हेही वाचा… गोवा मुंबई महामार्ग नैना प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी १५ मिनिटांसाठी रोखला

मात्र हा संदेश वाचण्यापूर्वीच त्याने जीवन संपवले. वर्षभरापूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाल्यापासून तो अबोल झाला होता. तो घरातून बेपत्ता झाल्या नंतर त्याची शोधाशोध सुरु करण्यात आली. त्यात त्याचे मोबाईल लोकेशन करावे गावाचे तलावाचे लोकेशन असल्याचे समोर आल्यावर त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता  तलावा जवळ  त्याची चप्पल आणि दुचाकी आढळून आली. त्याच आधारे अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात उतरून शोध घेतला असता त्याचा मृतदेह आढळला.

दुसऱ्या घटनेत  नेरुळ सेक्टर १६ येथे राहणाऱ्या नववीतील  विद्यार्थी पृथ्वी  ढवळे  याने राहत्या घरात चादरीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. यावेळी आई वडील कामानिमित्त बाहेर गेलेले होते. घरात कुणीच नसताना त्याने आपले जीवन संपवले. प्राथमिक माहिती नुसार आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत त्याने अभ्यास जमत नसल्याचे कारण सांगितले आहे. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गणिताचे उत्तर चुकले म्हणून बांबूने विद्यार्थीनीला मारहाण, गुन्हा दाखल 

घणसोली येथे शकीला अन्सारी नावाची महिला खाजगी शिकवणी घेत होती. याच ठिकाणी सना नावाची विद्यार्थिनी शिकवणीला जात होती. शनिवारी तिने गणिताचा गृहपाठ सर्वांना दिला. त्यात सनाला  गणित सोडवता आले नाही. त्यामुळे शकीलाने रागाच्या भरात बांबूने बेदम मारले. तिच्या अंगावर अनेक ठिकाणी मारलेल्या ठिकाणी बांबूचे वळ  दिसून येत होते. हि बाब पालकांच्या लक्षात येताच त्यांनी तडक कोपरखैरणे पोलीस ठाणे गाठले व शिक्षिकेच्या विरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी याच आधारे शकीलाच्या  विरोधात गुन्हा नोंद केला आहे.