विकास महाडिक

नवी मुंबईत  ३६ हजारांच्या घरात करोनाबाधितांची संख्या गेली असून ७३६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.  वैद्यकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवणारा खमक्या डॉक्टर अथवा वैद्यकीय ज्ञान असलेला अधिकारी पालिका सेवेत नियुक्त न केल्यास या आरोग्य यंत्रणा ही कोमात जाणार हे सांगण्यास कोणा ज्योतिषाची गरज नाही.

नवी मुंबईत दिवसेंदिवस करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.  दोन हजार रुग्णसंख्या झाल्यावर ‘आयुक्त हटाव, नवी मुंबई बचाव’चा नारा देणारी नवी मुंबईत ३६ हजार रुग्णसंख्येवर पोहोचल्यावरही इतकी संयमी का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

अडीच महिन्यांपूर्वी पालिकेची जबाबदारी घेतलेले आयुक्त अभिजित बांगर यांनी चाचण्या वाढल्या की रुग्णसंख्या वाढणार असे अगोदरच स्पष्ट केले होते. त्यामुळे कोणतीही लपवाछपवी न करता ही संख्या वाढत असून त्यासाठी लागणारी उपचारपद्धत सक्षम करण्यात येत आहे. त्यात काही उणिवा आहेत. या आजारातील मृत्युदर कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कधी तो यशस्वी तर कधी अयशस्वी होत आहे. करोनाचा प्रादुर्भाव सौम्य होईपर्यंत शहरातील रुग्णांची संख्या लाखापर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याची मानसिकता आता सर्वानीच केली असून सर्व काळजी घेऊन नागरिकांनी दैनंदिन व्यवहार सुरू केले आहेत.

करोनासारख्या महामारीत अनेक देश, राज्ये आणि शहरांनी आपली आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम, सुसज्ज आणि सुरळीत करण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून येते. नवी मुंबईत मात्र ही यंत्रणा अधिक अकार्यक्षम, अनागोंदी आणि अविश्वसनीय झाली आहे. त्याची अनेक उदाहरणे देता येतील. केवळ उंच इमारती, महागडे वैद्यकीय साहित्य यांचा दिखावा म्हणजे नवी मुंबईतील आरोग्य यंत्रणा असे म्हणता येईल. शहरातील प्रत्येक नागरिकाचे आरोग्य ठणठणीत राहावे यासाठी ३० वर्षांपूर्वी पालिकेने चतुर्थस्तरीय आरोग्य सुविधा उभारलेली आहे, मात्र आता ही यंत्रणा केवळ नावाला असून ती राजकारण, जात, पात, धर्म, पंथ, पक्ष आणि अकार्यक्षमता या दोषांनी वेढली गेली आहे. नियोजनबद्ध शहर असलेल्या नवी मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव वेळीच रोखता आला असता, पण येथील आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार तो जास्त फोफावण्यास कारणीभूत ठरला आहे. नवी मुंबई पालिकेत एकूण तीन हजार ६०० कायमस्वरूपी कर्मचारी-अधिकारी आहेत. त्यातील अर्धा कर्मचारी वर्ग हा केवळ पालिकेच्या आरोग्य विभागासाठी तैनात करण्यात आला आहे.

बोटावर मोजता येतील इतके डॉक्टर वगळता वैद्यकीय गुणवत्तेचा प्रचंड अभाव असलेले दोनशे डॉक्टर या सेवेत आहेत. हा वैद्यकीय सेवेतील केवळ गाळ म्हणता येईल. स्वबळावर कर्तृत्व बजावता येणार नाही याची खात्री झालेले हे डॉक्टर पालिकेच्या सेवेत चिकटलेले आहेत असे दिसून येते. त्यामुळे फारसे कौतुक करावे अशी कामगिरी या विभागाच्या नजरेस पडणार नाही. अनेक डॉक्टरांनी पालिकेची सेवा कायम ठेवताना आपल्या खासगी सेवेचा मेवादेखील कायम ठेवला आहे. त्यामुळे करोना नावाच्या युद्धात रणांगणावर सेनापती (आयुक्त) दिवस-रात्र लढत असताना डॉक्टर नावाचे योद्धे आपला इगो जपण्यात मश्गूल आहेत. करोना साहित्याच्या खरेदीचे पद पदरात कसे पडेल यासाठी व्यूहरचना रचली जात आहे. टाळूवरचे लोणी खाणारेही महाभाग या जत्रेत सामील आहेत. सनदी परीक्षा पास झालेल्या सर्वच अधिकाऱ्यांना वैद्यकीय क्षेत्रातील खाचखळगे माहीत असतात असे नाही. त्यामुळे ते या क्षेत्रातील निष्णातांच्या अधीन जातात हे स्पष्ट आहे. नवी मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाचा प्रमुख हा निष्णात नाही. जबाबदारी झटकण्याची अनेक कारणे त्यांच्याकडे असून कधी एकदा निवृत्त होतोय असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर असतात. या विभागात काय गौडबंगाल सुरू आहे. त्याची कल्पना आयुक्तांना आहेच असे म्हणता येणार नाही. त्यामुळे संजय उवाच (अतिरिक्त आयुक्त संजय काकडे म्हणतील तसे)चे किस्से पालिकेत सुरू झाले आहेत. नागपूरसारख्या मोठय़ा पालिकेचे आयुक्तपद सांभाळणारे आयुक्त डोळस आहेत. त्यामुळे त्यांना संजयची गरज का पडते, हा प्रश्न आहे.

आरोग्य विभागाच्या प्रमुखाला चार वेळा सांगूनही कळत नसेल तर त्याला वेळीच बाजूला करण्याची ताकद साथ रोग नियंत्रण कायद्याने दिली आहे. दिवसाला चार हजारांपेक्षा जास्त चाचण्या केल्या जात आहेत. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’मुळे हजारो कुटुंबांची आरोग्यविषयक माहिती संकलित होत आहे.

या सर्व वैद्यकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवणारा खमक्या डॉक्टर अथवा वैद्यकीय ज्ञान असलेला अधिकारी पालिका सेवेत नियुक्त न केल्यास या पालिकेची आरोग्य यंत्रणा ही कोमात जाणार हे सांगण्यास कोणा ज्योतिषाची गरज नाही. अंबरनाथसारख्या एका छोटय़ा नगरीतील करोना रुग्णसंख्या आटोक्यात आहे. कारण या पालिकेच्या कोविड आरोग्य विभागाची जबाबदारी संरक्षण दलातील एक डॉक्टर सांभाळत आहेत. हे या ठिकाणी नमूद करण्याची आवश्यकता आहे.