उरण: मोरा ते मुंबईतील भाऊचा धक्का या मार्गावरील रो रो जलसेवेच्या मोरा जेट्टीचे काम मागील सहा महिन्यांपासून बंद आहे. मात्र असे असले तरी लवकरच या रो- रो च्या कामाला सुरुवात करून जुलै २०२४ च्या निश्चित वेळी मार्ग सुरू होईल असा दावा महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

२०१८ ला मंजूर झालेल्या मोरा (उरण) ते मुंबई (भाऊचा धक्का) दरम्यानच्या रो रो सेवेचे काम निधी अभावी रखडले आहे. मागील सहा महिन्यांपासून या जेट्टीवर एकही दगड पडलेला नाही. मात्र जेट्टीचे काम लवकरच सुरू करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. उरण मधील नागरीकांसाठी आपल्या खाजगी वाहनांसह मुंबईत ये जा करता यावे या करीता मोरा ते मुंबई रो रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. या जलसेवेच्या कामाला सुरुवात झाली आहे. या जलमार्गाचे काम अनेक वर्षे रखडल्याने या कामाचा अंदाजित ५० कोटींचा खर्च वाढून ७५ कोटी वर पोहचला आहे.

हेही वाचा… पाण्याअभावी सिडकोच्या सागरी मार्गावरील नारळाची झाडे करपू लागली; कोट्यवधी रुपयांच्या चार हजार नारळाच्या वृक्षांची सुरक्षा ऐरणीवर

मोरा पोलीस ठाणे नजीक जेट्टीचे काम सुरू असून दगडांचा भराव करून जेट्टी बांधण्यात येत आहे. उरण वरून मुंबईत ये जा करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या रो रो जेट्टीच्या कामाला आधीच विलंब झाला आहे. त्यामुळे ही सेवा कधी सुरू होणार असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. रो रो सेवेचे काम बंद झाले नसून जेट्टीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला बील न दिल्याने तसेच मध्यंतरी दगड खाण बंदीमुळे काम थांबले होते. मात्र कंत्राटदाराला त्याचे बील देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जेट्टीचे काम सुरू करण्यात येईल व २०२४ च्या निश्चित केलेल्या वेळेत पूर्ण होईल अशी माहिती महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे कार्यकारी अभियंता सुधीर देवरे यांनी दिली.

उरणकरांसाठी वाहनासह जलप्रवासाचा उत्तम पर्याय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उरणच्या मोरा व मुंबईतील भाऊचा धक्का दरम्यानच्या रो रो जलप्रवासात उरणच्या नागरिकांना आपलं चार व दुचाकी वाहन घेऊन मुंबईत जाता येणार आहे. त्यामुळे वाहनासह उत्तम प्रवासाची सोय उपलब्ध होणार आहे.