नेरुळ सेक्टर सहामधील चौकात वाहतूक  नियमांचे तीनतेरा

नवी मुंबई : सुनियोजित शहर अशी ओळख असलेल्या नवी मुंबई येथे बेकायदा पार्किंगमुळे वाहतूक कोंडीची ठिकाणे वाढत आहेत. नेरुळ सेक्टर ६ मधील  रस्त्यावर ‘नो पार्किंग’चे फलक असूनही तेथे बेकायदा पार्किंग केले जात आहे. त्यामुळे या परिसरात मोठी वाहतूक कोंडी होत आहे.

नागरिकांना वाहनतळासाठी पुरेशी जागाही उपलब्ध करून न दिल्याने, रस्त्यावर गाडी चालवणे अथवा ती पार्क करणे दोन्ही कठीण झाले आहे. पाम बीच मार्गावरील नेरुळ येथील चौकाजवळच सारसोळे सेक्टर ६ येथही अशाच प्रकारे रस्त्यावर वाहने उभी केली जात आहेत.

नेरुळ पाम बीच मार्गाकडे जाणाऱ्या चौकात नेरुळ सेक्टर ६, राजीव गांधी उड्डाणपुलाकडून तसेच पाम बीच सोसायटीकडून येणाऱ्या वाहनांची गर्दी होते. त्यामुळे पाम बीच मार्गावर जाण्यासाठी मार्गिकाच उरत नाही. शिवाय येथे सिग्नल यंत्रणाही नसल्याने त्यामुळे हे ठिकाण नेरुळ येथील वाहतूक कोंडीचे नवे ठिकाण झाले आहे. वाहतूक विभागाने बेकाययदा पार्किंगवर कारवाई करावी आणि वाहतूक पोलीसही तैनात करावेत, अशी मागणी नागरिक करत आहेत.   नेरुळ येथील पाम बीच मार्गालगत सारसोळे सेक्टर ६ येथील चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत योग्य ती कारवाई करण्याचे, तसेच ही कोंडी होऊच नये, यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी दिले आहे.