उरणमध्ये भारत पेट्रोलियम कॉपरेरेशनचा घरगुती गॅस भरणा प्रकल्प असून येथून देशभरात गॅसचा पुरवठा केला जातो. या प्रकल्पात गॅस भरण्यासाठी येणारे शेकडो टँकर रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे केले जात असल्याने येथे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही कोंडी न होण्यासाठी सिडकोने नो पार्किंगचे सूचना फलक लावलेले असतानाही येथे टँकर उभे केले जात असल्याने उरणच्या वाहतूक विभागाने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमुळे द्रोणागिरी नोडमधील रस्ते मोकळे होणार आहेत.
उरण आणि वाहतूक कोंडी हे आता एक समीकरणच बनले आहे. या वाहतूक कोंडीमुळे अपघातांतही वाढ होऊन अनेकांना जीव गमावावे लागत आहेत. द्रोणागिरी नोड, भेंडखळ येथील भारत पेट्रोलियम गॅस प्रकल्पाच्या परिसरात दररोज शेकडो गॅसचे टँकर येऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनेक दिवस उभे राहत असल्याचे उरणचे आमदार मनोहर भोईर यांनी संबंधित विभागांच्या निदर्शनात आणले होते. या बेकायदा वाहनांवर कारवाई करण्याची मागणीही आमदारांनी केली होती. त्यानुसार उरणच्या वाहतूक विभागाने गॅस टँकरवर दंडात्मक कारवाई करून ही वाहने रस्त्यावरून हटविण्यास सुरुवात केल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.