नवी मुंबई : नेरुळ परिसरातील टी एस चाणक्य तलाव, एनआरआय व डीपीएस तलाव या जागा पाणथळीच असल्याचे विभागीय वन अधिकारी कांदळवन विभाग यांनी याबाबतचा अहवाल सादर केला आहे. तसेच अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक, कादंळवन कक्ष, मुंबई यांनी हा स्थळ पाणी अहवाल लॉ ग्लोबल संस्था तसेच शासनाला दिल्याने या ठिकाणच्या जागा पाणथळीच असल्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे पर्यावरणप्रेमीमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

नेरुळ सीवूड्स परिसरात असलेल्या या पाणथळ जागांवर बांधकाम व्यावसायिकांचे लक्ष असल्याने या परिसरातील जागा या पाणथळ जागा नसल्याचा दावा करण्यात येत होता. मुख्यमंत्र्यांनीच डीपीएस तलाव संरक्षित राखीव क्षेत्र घोषित केल्याने फ्लेमिंगोंचा अधिवास कायम झाला आहे. तर दुसरीकडे सेव्ह नवी मुंबई एन्व्हायर्न्मेंट तसेच लॉ ग्लोबल संस्थेनेही नवी मुंबईतील पाणथळ जागा व तसेच टी. एस. चाणक्य परिसरातील जवळजवळ १०० ते १२५ कांदळवन झाडे १ वर्षापूर्वी तोडण्यात आल्याप्रकरणी तक्रारही केली होती. महसूल विभगानेही पोलीसात कांदळवनाची कत्तल केल्याप्रकरणी तक्रार दिली होती. त्यामुळे २३ डिसेंबर २०२४ रोजी विविध घटकांनी पाहणी करत स्थळपाहणी केली होती. त्यात वॉटर बॉडी दिसत असल्याचे नमूद केले आहे.

त्याचप्रमाणे एनआरआय वॉटरबॉडीही कादंळवनापासून ५० मीटर असल्याचे दिसून आल्याचे तर डीपीएस तलावही कांदळवनापासून ५० मीटर आत असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे या तिन्ही जागा पाणथळ जागा निश्चित असल्याचा दावा पर्यावरण संस्थांनी केला. तर त्याबाबत अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक कांदळवन कक्षाचे एस व्ही रामाराव यांनी शासनाकडे दिलेल्या अहवालात याविषयी स्पष्ट उल्लेख केला आहे. याबाबत एस. व्ही. रामाराव यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

एनआरआय, टीएस चाणक्य तसेच डीपीएस तलाव हा पाणथळ क्षेत्रच असल्याचे वारंवार आम्ही दाखवून दिले आहे. याबातचा अहवाल एस. व्ही रामाराव यांनीच शासनाला दिला आहे. त्यामुळे सिडकोने पाणथळी नसल्याबाबतचा दावा मागे घ्यावा व मेस्त्री कन्सट्रक्शनसोबतचा करार रद्द करावा.

सुनील अग्रवाल, सेव्ह नवी मुंबई एन्व्हायर्न्मेंट