पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या व्यवस्थापनाला सूचना

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व खासगी रुग्णालयातील डॉक्टर आणि नवी मुंबईमधील वेगवेगळ्या खासगी वैद्यकीय शाखांचे पदाधिकारी यांनी पालिका रुग्णालयातील व्यवस्थापनाला साहाय्य करण्याच्या सूचना पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी झालेल्या एका बैठकीत केले.

खासगी रुग्णालयांच्या आरोग्य सेवेच्या सहभागाबाबत तसेच त्यांना वेगवेगळ्या कायद्यांचे पालन करणे बाबत आणि खासगी रुग्णालयामार्फत सर्व राष्ट्रीय कार्यक्रमांचे अहवाल सादर करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान याचा वापर करणे अत्यंत आवश्यक असल्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

आयुक्तांनी पालिकेच्या सार्वजनिक रुग्णालय वाशी येथे नवी प्रणाली सुरू करण्यात आली आहे. पुढील काही दिवसांत सार्वजनिक रुग्णालय ऐरोली आणि नेरुळ तसेच माता बाल रुग्णालय, बेलापूर येथेही सर्व सेवा नागरिकांना ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच पालिका कार्यक्षेत्रात सध्या कार्यरत २१ नागरी आरोग्य केंद्रातही मार्च २०१७  अखेपर्यंत सर्व नव्या सेवा प्रणालीमार्फत ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे मुंढे म्हणाले.

पालिका कार्यक्षेत्रातील सर्व खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांना माहिती तंत्रज्ञान प्रणालीचा वापर करणे आवश्यक असल्याबाबतचे महत्त्व पटवून देण्यात आले.

अत्यंत गरिबांसाठी पूर्ण मोफत उपचार

बॉम्बे पब्लिक ट्रस्ट अ‍ॅक्ट १९५०  अंतर्गत जे रुग्णालय रुग्णालय धर्मादाय विश्वस्तांकडे नोंदणीकृत आहेत, अशा सर्व रुग्णालयांना कार्यक्षेत्रातील  अत्यंत गरीब वर्गातील दहा टक्के लोकांसाठी पूर्ण  मोफत आणि इतर १० टक्के गरीब लोकांसाठी सवलतीच्या दरात आरोग्य सेवा पुरविणे बंधनकारक असेल.  सभेत खासगी रुग्णालयांतील डॉक्टरांनी पालिका क्षेत्रात  किती रक्तपेढय़ा आहेत आणि किती नवजात शिशु दक्षता विभाग आहेत. याबाबत माहिती ऑनलाइन उपलब्ध करून देण्याबाबत सूचना केल्या.