नवी मुंबई : नवी मुंबईतील महत्त्वपूर्ण असलेल्या तुर्भे रेल्वे स्थानक असुविधांच्या गराड्यात आहे. रेल्वे स्थानकाच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांना अक्षरशः हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. स्थानकातील पंखे बंद, पायऱ्या तुटलेल्या तर जागोजागी कचरा पडलेला अशी स्थिती आहे. उकाडा वाढल्याने प्रवाशांचा घामाघूम होऊन प्रवास सुरू आहे. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी प्रवाशांची अधिक घुुसमट होत आहे.
स्थानकाच्या पायऱ्याही ठिकठिकाणी उखडल्या गेल्या असून, वृद्ध नागरिक, महिला आणि लहान मुलांना चढ-उतार करताना घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. भुयारी मार्गात सतत तुंबणारी गटार व्यवस्था आणि यामुळे पावसाळ्यात साचणारे पाणी याचा प्रचंड त्रास स्थानकातून प्रवास करणाऱ्यांना सहन करावा लागतो आहे. शौचालयांची स्थिती तर अत्यंत दयनीय आहे. प्लॅटफॉर्मलगत असलेली सार्वजनिक शौचालये घाणेरड्या अवस्थेत असून, या ठिकाणी अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे प्रवासी नाराज आहेत. महिला प्रवाशांना तर याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.
प्रशासन उदासीन
प्रवाशांसाठी सुविधा निर्माण करणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे की शिक्षा? तुर्भे स्थानकावर तर श्वास घेणेही कठीण होते, असे संतप्त मत रोज प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाने व्यक्त केले. तुर्भे स्थानक हे नवी मुंबईतील महत्त्वाचे स्थानक असून, येथे दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. एवढ्या मोठ्या संख्येने प्रवासी वाहतूक होत असतानादेखील मूलभूत सुविधा उपलब्ध नसणे, ही प्रशासनाची घोर उदासीनता आहे, अशी प्रवाशांची तक्रार आहे.
स्वच्छता मोहीम केवळ फोटोपुरतीच
रेल्वे प्रशासनाने वेळोवेळी स्वच्छता आणि देखभाल याबाबत आश्वासने दिली असली, तरी प्रत्यक्षात त्याचे कोणतेही मूर्त रूप दिसून येत नाही. विशेष म्हणजे नुकतेच महापालिकेकडून या रेल्वे स्थानकात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असली तरी ती केवळ फोटो पुरतीच मर्यादित असल्याचे स्थानिक म्हणत आहेत. प्रवाशांनी यासंदर्भात वेळोवेळी तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे आता तुर्भे स्थानकातून प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये संतापाची तीव्र भावना आहे.